• Fri. Jun 9th, 2023

विनापरवानगी समारंभ घेतल्यास आयोजकांवर फौजदारी

ByGaurav Prakashan

Feb 13, 2021

अमरावती : कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांत जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी जारी केलेल्या निर्देशानुसार, लग्नसमारंभ वगळता इतर सर्व सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी कायम आहे. तरीदेखील काही ठिकाणी बिनदिक्कत सभासमारंभाचे आयोजन किंवा लग्नात र्मयादेहून अधिक उपस्थिती, तसेच इतरही गर्दीतील कार्यक्रम आयोजित केले जात असल्याच्या तक्रारी होत आहेत. असे प्रकार आढळताच दंडात्मक व फौजदारी कारवाई तत्काळ करून कायद्याची जरब निर्माण करावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष शैलेश नवाल यांनी यंत्रणेला दिले आहेत. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये केवळ लग्नसमारंभासाठी तेही केवळ पन्नास व्यक्तींच्या उपस्थितीची र्मयादा घालून परवानगी देण्यात आली आहे. यात्रा, मिरवणुकी, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय सभा, समारंभ या सर्वांवर आपत्ती नियंत्रण कायदा व त्या अनुषंगाने इतर विविध अधिनियम व नियमांनुसार यापूर्वीच बंदी घालण्यात आली आहे. वेळोवेळी त्याबाबत आदेश जारी करण्यात आले आहेत. पोलीस, स्थानिक स्वराज्य संस्था व इतर यंत्रणांना कारवाईसाठी निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे कुठेही गर्दी किंवा कार्यक्रम होत असल्याचे आढळल्यास तत्काळ कारवाई करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी नवाल यांनी दिले आहेत.छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अर्थात शिवजयंती हा उत्सव दि. १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर मोठय़ा प्रमाणात साजरा केला जातो. कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी दि. १९ फेब्रुवारी, २0२१ रोजीचा छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबत शासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून, त्यांचे जिल्ह्यातील नागरिकांनी पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी केले आहे. यावर्षी कोविड- १९ चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठय़ा प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने शिवजयंती उत्सव साजरा करणे अपेक्षित आहे. दरवर्षी शिवजयंती साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु यावर्षी कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. त्याऐवजी या कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाइन प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी. तसेच, कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करुन त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन करून र्मयादित व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. शिवजयंतीच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम/शिबिरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी.आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींग तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे, अशा सूचना शासनाने जारी केल्या आहेत. सर्वांनी त्याचे पालन करून कोरोना प्रतिबंधासाठी सहकार्य करावे, असे आवाहन नवाल यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *