• Fri. Jun 9th, 2023

लस टोचावीच लागणार…!

ByGaurav Prakashan

Feb 1, 2021

मार्च २०२० ला भारत भर नाही तर संपूर्ण जगभर कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात सुरु झाला होता. तेव्हा पासूनच प्रत्येक भारतीय कोरोनाची लस केव्हा उपलब्ध होते ह्याची चातका सारखी प्रतीक्षा बघत होता. शात्रज्ञांनी अथक परिश्रम करून अखेर कोरोनावर लस शोधली आणि सगळ्यांचा जीवात जीव आला. सध्या कोरोना लसीकरणाची मोहीम बऱ्यापैकी सुरु असून त्याचे परिणाम सुद्धा चांगले असल्याचे समाधान आहे. नागरिकांना मध्ये जी दहशत कोरोनाची होती ती लसीचा शोध लागल्यामुळे कमी झाली आहे.
बऱ्यापैकी उत्साह नागरिकांमध्ये लसीकरणाचा असून प्रत्येक जण पुढाकार घेत आहेत. सध्या प्रत्येक नागरिक हा आपल्या स्वास्थाबद्दल जागरूक झालेला आहे.
इतिहासात बऱ्यापैकी महामाऱ्या, साथींच्या रोगांनी थैमान घातल्याची नोंद आपल्याला आढळते व बऱ्याच जणांना आपल्या प्राणाला सुद्धा मुकावे लागले आहे. ह्या रोगांवर सुद्धा शात्रज्ञांनी वेळोवेळी संशोधन करून लसींचा शोध लावलेला आहे.
हे झाले आरोग्य लसीकरणाबाबत. ह्या व्यक्तिगत नागरिकांच्या आरोग्य सोबतच सामाजिक आरोग्य सुद्धा चांगले असण्याची गरज आहे. आपण आज मोठ्या अभिमानाने म्हणतो की, आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. परंतु ह्या तंत्रज्ञानाच्या युगात सुद्धा माणूसपण वेळोवेळी हरविल्याची जाण आपणास होते आहे. व्हाटअप्स द्वारे चुकीचे संदेश पाठविल्या जातात. त्यामुळे सामाजिक सलोखा हा अस्वस्थ करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. मध्यंतरी तर आपल्या पोलीस यंत्रणेला सुद्धा चुकीचा संदेश समाज मध्ये सोडला तर ग्रुप ऍडमिन विरोधात गुन्हा दाखल केला जाईल असा इशारा सुद्धा द्यावा लागला होता. काही ग्रुप ऍडमिन नी तर व्हाट्स अँप्स ग्रुप ओन्ली फॉर ऍडमिन असे सेटिंग करून ग्रुप मधील इतरांना संदेश पाठविण्यास मज्जाव केला होता. उद्देश हाच होता की विघटनकारी संदेश समाजामध्ये पसरू नये व सामाजिक सलोखा हा चांगला राहावा.
संगणीकीकरण, तंत्रज्ञान आपण का स्वीकारले तर ते सुरक्षित असणार होते म्हणून. सगळीकडे मोठ्या प्रमाणात सर्वांचेच संगणीकरण झाले. आज जवळपास सर्वच व्यवहार हे ऑन लाइन झाले आहेत. आपला वेळ वाचला आहे, परिश्रम वाचले आहेत. परंतु आपला मनस्ताप मात्र हा कमी झालेला नाही आहे. तक्रारी वाढलेल्या आहेत. त्या दुसऱ्या बाजूने फोन येऊन हा साधा माणूस फसविल्या गेल्याची अनेक प्रकरणे आपल्या समोर येतात आहेत. ह्या संगणीकरणाच्या पडद्याच्या आड हे विघटनवादी विचार नेमके कुठून येतात ? ह्याची काळजी घेण्याची गरज आहे.
अशी बरीच प्रकरण ऐकवात आहेत की, आज अमक्याला काही खोटी बतावणी देऊन त्याच्या बँकेच्या खात्यावर हात साफ करण्यात आला आहे.
सायबर गुन्ह्या मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे ही खरोखरच चिंता करण्याची बाब आहे. आपल्या आरोग्य बरोबर ह्या असल्या सामाजिक बिघडलेल्या आरोग्यावर सुद्धा जालीम उपाय करण्याची नितांत गरज आहे. ही सुद्धा भयंकर मोठी सामाजिक महामारीच आहे. असे म्हणतात की, माणसाच्या शरीरात विष गेले तर ते काढता येत, त्यावर इलाज केला जातो. परुंतु एकदा का हेच विष माणसाच्या कानात गेले की समाजाचे पिढ्यान पिढ्या बरबाद होतात.
अजूनही तंत्रज्ञानाच्या माध्यमाने बरीच अफवा पसरविणारे, खोटी मॅसेज मुद्दाम पणे मोठ्या प्रमाणात व्हायरल केली जातात. आपण ह्या मॅसेजचा कुठलाही पाठपुरावा न करता आपण सुद्धा त्याला हातभार लावत असतो. काही मॅसेज तर इतके भावनिक असतात की ते पटणारे, आव्हान करणारे व आपल्याला व्हायरल करण्यासाठी उद्युक्त करणारे असतात.
आज ह्या अशाप्रकारच्या व्हायरल मॅसेज वर नियंत्रण आणण्याची गरज आहे कारण की ही सुद्धा महामारी बऱ्या पैकी विस्तारलेली आहे. ह्या महामारी वर सुद्धा लसीकरण करण्याची गरज आहे जेणे करून ही महामारी अधिक पसरू नये.
ह्या विघटन विचारांच्या महामारीवर लस टोचावीच लागणार..!

    अरविंद सं. मोरे,
    अतिथी संपादक
    गौरव प्रकाशन
    नवीन पनवेल पूर्व
    मो.९४२३१२५२५१.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *