अमरावती : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. जिल्ह्यातील लसीकरणाचे प्रथम मानकरी ठरलेल्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे व महिला वैद्यकीय अधिकारी उज्ज्वला मोहोड यांनी आज लसीचा दुसरा डोस घेतला. पहिल्या टप्प्यात कोरोना प्रतिबंधासाठी काम करणा-या फ्रंटलाईन वर्कर्सना ही लस दिली जात आहे. पहिल्या डोसनंतर 28 दिवसांनंतर दुसरा डोस दिला जातो. जिल्ह्यात 16 जानेवारीला या मोहिमेचा शुभारंभ झाला. पहिल्या दिवशी 440 व्यक्तींनी लस घेतली होती. त्यानंतर लसीकरणाचा वेग वाढविण्यात आला. आतापर्यंत सुमारे 11 हजार व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी दिली. पहिल्या दिवशी लसीकरण झालेल्या व्यक्तींना आज दुसरा डोस देण्यात आला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्यासह अनेक डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी यांचा त्यात समावेश होता.
पहिल्या टप्प्यात 16 हजार 262 हेल्थ केअर वर्करचे लसीकरण अपेक्षित आहे. कोविशिल्ड व कोव्हॅक्सीन दोन लसींचा लसीकरणात समावेश आहे. लसीकरणाचा दुसरा डोसही प्राप्त झाल्याने शरारीत सक्षम प्रतिकारशक्ती यंत्रणा निर्माण होऊन कोरोनावर मात करण्याचा विश्वास निर्माण झाला आहे. ही लस सुरक्षित आहे. पहिल्या टप्प्यातील सर्व कोविड योद्ध्यांनी तातडीने ही लस घ्यावी, असे आवाहन श्री. साखरे व श्री. मोहोड यांनी केले.
लसीकरणाचा दुसरा डोस देण्याची प्रक्रिया सुरू
Contents hide