मुंबई : बाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्याने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेने कडक पावले उचलली आहेत. त्यानुसार लग्न समारंभाची मंगल कार्यालये, जिमखाना, नाईट क्लब, उपहारगृहं, चित्रपटगृहं, सर्वधर्मिय स्थळं, खेळाची मैदाने व उद्याने, सार्वजनिक ठिकाणे, शॉपिंग मॉल, सर्व खासगी कार्यालये या ठिकाणी अचानक धाड टाकण्यात येणार आहे. त्या ठिकाणी मास्कचा वापर होत नसेल आणि ५0 पेक्षा अधिक व्यक्ती एकावेळी आढळल्यास त्या व्यक्तीकडून दंड वसूल करण्यात येणार आहे. तसेच त्या-त्या आस्थापनांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
कोरोनाच्या नवीन विषाणूचा काही देशांमध्ये प्रसार वाढला आहे. तर मुंबईत कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू असतानाच गेल्या काही दिवसांत बाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. याची गंभीर दखल घेऊन पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी गुरुवारी सर्व अतिरिक्त आयुक्त, परिमंडळीय सहआयुक्त, उपआयुक्त, सर्व विभाग कार्यालयांचे सहायक आयुक्त यांच्यासमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. त्यावेळी आयुक्तांनी परिस्थितीचा आढावा घेऊन काही महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.
दररोज होणार धाडसत्र..
लग्नसोहळ्यांचे आयोजन होणारे सभागृह, मंगल कार्यालये येथे नियमितपणे तपासणी करण्याचे आदेश सर्व २४ सहायक आयुक्तांना देण्यात आले आहेत. त्यानुसार प्रत्येक विभागात दररोज किमान पाच जागांवर धाड टाकून नियमांचे उल्लंघन करणार्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तर लग्नाचे आयोजक, पालक व संबंधित व्यवस्थापनांवर देखील गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. असे धाडसत्र नाईट क्लब, उपहारगृहं, चित्रपटगृहं, सर्वधर्मिय स्थळं आदी ठिकाणीही होणार आहेत.
लग्न समारंभ, नाईट क्लब अन् खासगी कार्यालयांवर अचानक धाडसत्र
Contents hide