• Wed. Jun 7th, 2023

लग्नसमारंभात मर्यादेहून अधिक व्यक्ती आढळल्यास तात्काळ कारवाई करा-जिल्हाधिकारी शैलेश नवाल

ByGaurav Prakashan

Feb 13, 2021

अमरावती : कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांत जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी जारी केलेल्या निर्देशानुसार, लग्नसमारंभ वगळता इतर सर्व सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी कायम आहे. तरीदेखील काही ठिकाणी बिनदिक्कत सभासमारंभाचे आयोजन किंवा लग्नात मर्यादेहून अधिक उपस्थिती, तसेच इतरही गर्दीतील कार्यक्रम आयोजित केले जात असल्याच्या तक्रारी होत आहेत. असे प्रकार आढळताच दंडात्मक व फौजदारी कारवाई तत्काळ करून कायद्याची जरब निर्माण करावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष शैलेश नवाल यांनी यंत्रणेला दिले आहेत.
सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये केवळ लग्नसमारंभासाठी तेही केवळ पन्नास व्यक्तींच्या उपस्थितीची मर्यादा घालून परवानगी देण्यात आली आहे. यात्रा, मिरवणुकी, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय सभा, समारंभ या सर्वांवर आपत्ती नियंत्रण कायदा व त्या अनुषंगाने इतर विविध अधिनियम व नियमांनुसार यापूर्वीच बंदी घालण्यात आली आहे. वेळोवेळी त्याबाबत आदेश जारी करण्यात आले आहेत. पोलीस, स्थानिक स्वराज्य संस्था व इतर यंत्रणांना कारवाईसाठी निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे कुठेही गर्दी किंवा कार्यक्रम होत असल्याचे आढळल्यास तत्काळ कारवाई करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *