• Mon. Sep 25th, 2023

राठोड यांच्या राजीनाम्याशिवाय अधिवेशन चालू देणार नाही

ByGaurav Prakashan

Feb 27, 2021

मुंबई : राज्यभर गाजत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन भाजपाने आक्रमक भूमिका घेतली असून वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतल्याशिवाय अधिवेशन चालू देणार नाही असे भाजपाने स्पष्ट केले आहे. राठोड यांचा राजीनामा नाही घेतला तर आम्ही अधिवेशन चालू देणार नाही, असे भाजप मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी स्पष्ट केले आहे. बीड जिल्ह्य़ातील परळी वैजनाथ येथील तरुणी पूजा चव्हाण हिने पुण्यात केलेल्या कथित आत्महत्येप्रकरणात राठोड यांचे नाव घेतले जात असल्याने त्यांच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कारवाई करावी अशी मागणी भाजपाकडून केली जात आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

भातखळकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना, एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणामध्ये नाव समोर घेतले जाणार्‍या मंत्र्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करुन एफआयआर दाखल करण्याची गरज होती. मात्र राज्य सरकार आणि मुख्यमंत्री कसली वाट पाहतंय?, असा प्रश्न उपस्थित केला. तसेच भातखळकर यांनी राठोड प्रकरणावरुन ठाकरे सरकारव निशाणा साधताना, बलात्कारी आणि महिलांवर अत्याचार करणार्‍यांची पाठराखण करणारे हे सरकार असल्याचा टोलाही लगावला आहे. पुण्यामध्ये आत्महत्या केलेली तरुणी आणि मंत्र्यांच्या ऑडिओ क्लिप फिरत आहेत. तरी हे मंत्री उघड फिरतायत. यावर राज्यात काहीच होत नाहीय हे खेदजनक असल्याचेही भातखळकर यांनी म्हटले आहे.
राठोड प्रकरणामुळे सरकारची बदनामी होत असल्याने मुख्यमंत्री नाराज असल्याचे वृत्त सुत्रांच्या हवाल्याने देण्यात आले आहे. राठोड प्रकरणासंदर्भातील आरोपांमुळे सरकारची रोज नाचक्की होत आहे. या प्रकरणावरुन विरोधकांकडून सतत टीका आहेत. सोशल नेटवर्किंगबरोबरच प्रत्यक्षात प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियावरील वक्तव्यांच्या माध्यमातूनही ठाकरे सरकारवर टीका होताना दिसत आहे. या सर्वांचा सरकारच्या प्रतिमेवर नकारात्मक परिणाम होत असल्याचे दिसून येत आहेत.