औरंगाबाद : हवामानशास्त्र विभागानुसार, काही दिवसांपासून उ. महाराष्ट्र, विदर्भावर समुद्रसपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांमुळे दोन दिवस अवकाळी पावसाचे सावट आहे.
राज्यातील २८ जिल्ह्यांना गारपीट, पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, बुधवारी नागपूर शहर, भंडारा, बाळापूर (जि. अकोला), खामगाव (जि. बुलडाणा) परिसरात हलका पाऊस झाला. हवामानशास्त्र विभागानुसार, चक्राकार वारे व पूर्वेकडील वाऱ्यांमुळे या चक्रवात स्थितीपासून उत्तर कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तसेच खंडित वाऱ्यांचे प्रवाह, बंगालच्या उपसागरातून होणारा बाष्पाचा पुरवठा आणि उत्तर भारताकडून येणारे थंड वारे यामुळे अवकाळी पावसास पोषक वातावरण आहे. पुणे वेधशाळेने मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात १८ व १९ फेब्रुवारी रोजी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा दिला आहे.
कुलाबा वेधशाळेने राज्यातील २९ जिल्ह्यांना गारपिटीसह पावसाचा इशारा दिला आहे. धुळे, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, जालना या जिल्ह्यांसाठी आॅरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांत मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे, तर नंदुरबार, नगर, पुणे,सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट आहे.
राज्यातील 28 जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा; विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रावर अवकाळीचे सावट
Contents hide