• Fri. Jun 9th, 2023

रस्त्यावरील वाढते अपघात चिंताजनक – नितीन गडकरी

ByGaurav Prakashan

Feb 11, 2021

नवी दिल्ली : केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते अपघातांनी होणार्‍या मृत्यूंच्या प्रमाणात २0२५ सालापयर्ंत ५0 टक्के घट होणे सुनिश्‍चित करण्यासाठी हितसंबंधितांनी सर्वसमावेशक प्रयत्न करण्याचे आवाहन केले. आंतरराष्ट्रीय रस्ते परीसंघाच्या भारत विभागाच्या वतीने झालेल्या भारतातील रस्ते सुरक्षा आव्हाने आणि कृती आराखडा या विषयावर सुरू असलेल्या डिजिटल परिसंवाद मालिकेच्या उद््घाटन प्रसंगी ते बोलत होते.
गडकरी म्हणाले की, रस्त्यावरील अपघात परिस्थिती चिंताजनक असून रस्ते अपघातात जगात अमेरिका आणि चीनच्याही पुढे आपण पहिल्या क्रमांकावर आहोत. रस्त्यावरील सुरक्षिततेच्या जागृती साठी सध्या भारतभर रस्ता सुरक्षा मास पाळला जात आहे. रस्ता सुरक्षिततेच्या सर्व बाबींचा समावेश करणार्‍या १२ डिजिटल परिसंवाद वर्षभर आयोजित करण्यात येणार आहेत, असेही ते म्हणाले.
देशात दरवर्षी १.५ लाख लोक मृत्यूमुखी पडतात आणि ४.५ लाख लोक रस्ते अपघातात जखमी होतात. हे प्रमाण दरदिवशी ४१५ मृत्यू इतके आहे. या अपघातांमुळे देशाच्या राष्ट्रीय जीडीपीच्या ३.१४ टक्के सामाजिक आर्थिक नुकसान होते आणि मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी ७0 टक्के लोक १८ ते ४५ या वयोगटातील असतात, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
मंत्रालयाने केलेल्या प्रयत्नांना अधोरेखित करत गडकरी म्हणाले की, सुधारीत अभियांत्रिकी, शिक्षण, अंमलबजावणी, आपत्कालीन सेवा या काही मंत्रालय उपाय योजना या प्रश्नांच्या मुकाबल्यासाठी घेतल्या आहेत. ते म्हणाले की, मंत्रालयाने महामार्गावरील जाळ्यातील पाच हजार अपघातप्रवण ठिकाणे शोधून काढली आहेत आणि ४0 हजार किलोमीटर पेक्षा अधिक लांबीच्या रस्त्यांचे सुरक्षिततेसाठी सर्वेक्षण केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *