• Mon. Sep 25th, 2023

मेहंदीचे डाग काढताना..

ByGaurav Prakashan

Feb 26, 2021

आपल्या संस्कृतीमध्ये मेहंदीला संपन्नता आणि सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं. सवाष्णी प्रत्येक शुभप्रसंगी हातावर मेहंदी रेखतात. काही समाजामध्ये आधीची मेंदी जायच्या आधीच नवी मेहंदी हातावर रेखली जाते. सौभाग्याचं प्रतीक असल्यामुळे मेहंदी समारंभपूर्वक रेखाटली जाते. पण कधीकधी हातावर मेहंदीचे पुसट होत असलेले डाग सौंदर्यात बाधा आणतात. काही वेळा हे डाग लवकर निघावेत अशी इच्छा असते पण नैसर्गिक पद्धतीनं डाग निघून जाण्यास काही अवधी जावा लागतो. असं असताना नवीन मेहंदी रेखायची असेल तर मेहंदीचे डाग काढून टाकण्याचे काही उपाय अनुसरायला हवेत. आज त्याचीच चर्चा.
यासाठी ऑलिव्ह ऑईल सर्वात गुणकारी सिद्ध होतं. एका बाऊलमध्ये ऑलव्ह ऑईल घ्या. त्यामध्ये कापसाचा बोळा बुडवा आणि हा बोळा मेहंदीचे डाग असणार्‍या ठिकाणी फिरवा. ऑलिव्ह ऑईल दहा मिनिटे हातावर रहायला हवं. त्यानंतर कोमट पाण्यानं हात धुवून टाका. उरलीसुरली मेहंदी निघून गेलेली दिसेल.
मेहंदीचे डाग हटवण्यासाठी क्लोरीन आणि पाण्याचं मिर्शण उपयुक्त सिद्ध होतं. या मिर्शणात पाच मिनिटं हात बुडवून बसा. त्यानंतर थंड पाण्यानं हात धुवा. या उपायानंही हातावरचे डाग निघून गेलेले दिसतील.
तीन चमचे बेकिंग सोडा आणि एका लिंबाचा रस एकत्र करा. याची दाट पेस्ट बनवा. ही पेस्ट हातावर चोळा. दहा मिनिटानंतर कोमट पाण्यानं हात धुवून टाका. मेहंदीचे डाग निघून जातील.
हातावरील मेहंदीचे डाग घालवण्यासाठी ब्लीचिंग पावडरदेखील कामी येऊ शकते. ब्लीचिंग पावडरमध्ये थोडंसं पाणी मिसळून दाट पेस्ट तयार करावी आणि त्याचा जाडसर थर हातावर द्यावा. सुकल्यानंतर लेप काढून टाकावा आणि पाण्यानं हात धुवावेत. दोन-तीन वेळा हा उपाय केल्यास मेहंदी पूर्णपणे निघून गेलेली दिसेल. या कामी बटाट्याच्या रसाचाही उपयोग होतो. बटाट्याचा रस हातावर चोळा आणि काही वेळानंतर कोमट पाण्यानं हात धुवा.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!