• Thu. Sep 28th, 2023

मुलगा जिवंत आहे समजून आईने रात्रभर सेवा केली

ByGaurav Prakashan

Feb 25, 2021

मुंबई : मुंबईत मन हेलावून सोडणारी एक घटना समोर आली आहे. एक ७0 वर्षीय वृद्ध महिलेने मुलगा जिवंत आहे, असे समजून संपूर्ण रात्र त्याच्या शेजारी बसून काढली. तिने त्याच्या जखमांवर मलमपट्टी सुद्धा केली. या महिलेचा मुलगा घरामध्ये पडला, त्यात त्याचा मृत्यू झाला असे पोलिसांनी बुधवारी सांगितले.
मुंबईच्या कलिन भागात सोमवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. नशेमध्ये असलेला महिलेचा ४२ वर्षीय मुलगा घरातील बाथरुममध्ये पाय घसरुन पडला. त्यात त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला होता, असे पोलिसांनी सांगितले. आई आणि मुलगा दोघेही मेघालयाचे आहेत. मुलगा बाथरुममध्ये निपचित पडल्याचे आईन पाहिले. त्यानंतर तिने मुलाला खेचून बाहेर आणले व मोठय़ा मुलाच्या शेजारी झोपवले.तो मुलगा सुद्धा अंथरुणाला खिळून आहे. आपला मुलगा जिवंत आहे, असे समजून तिने त्याच्या जखमांवर मलमपट्टी सुद्धा केली.
दुसर्‍या दिवशी सकाळी मुलगा उठला नाही, तेव्हा तिने नातेवाईकांना कळवले. नातेवाईक घरी पोहोचल्यानंतर रुग्ण कुठलाही प्रतिसाद देत नसल्याचे लक्षात आले. त्यांनी लगेच पोलिसांना कळवले. पोलीस जखमी मुलाला जवळच्या रुग्णालयात घेऊन गेले, तिथे त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!