• Mon. Sep 25th, 2023

मुख्यमंत्री साहेब, नक्षलवादी होण्याची परवानगी द्या

ByGaurav Prakashan

Feb 27, 2021

हिंगोली : हिंगोलीमधील एका शेतकर्‍याने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये या तरुण शेतकर्‍याने मुख्यमंत्र्यांकडे थेट नक्षलवादी होण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केली आहे. सेनगाव तालुक्यातील ताकातोडा गावाचे रहिवाशी असणार्‍या नामदेव पतंगे या शेतकर्‍याने हे पत्र लिहीले आहे. प्रशासन शेतकर्‍यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप या पत्रामध्ये पतंगे यांनी केला आहे.
मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये पतंगे यांनी एक शेतकरी म्हणून आपली व्यथा मांडली आहे. माझे वडील, माझे आजोबाही शेतीच करायचे. मग आमचा वडिलोपार्जित व्यवसाय जर शेती असेल तर आम्हाला एक वर्षीचा दुष्काळ का सहन होऊ नये? मुख्यमंत्री महोदय तुमच्या शासन व्यवस्थेने आमच्या अंगाच्या चिंधड्या करून ठेवल्या. तुम्ही कर्जमाफी दिलीत पण ती आमच्यापर्यंत पोचलीच नाही, तुम्ही योजना आणली पिकेल ते विकेल पण आमच्याकडे पिकलेच नाही तर विकावे काय?, असा प्रश्न या शेतकर्‍याने मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. त्याचप्रमाणे पत्रामध्ये मांडण्यात आलेली कैफियत केवळ माझीच नसुन माझ्यासारख्या हजारो तरुणांची असल्याचे पतंगे यांनी पत्रामध्ये नमूद केले आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

तुम्ही पिकले नाही म्हणुन अनुदान दिलंय. पण नुकसान एक हेक्टर आणि मदत नऊ हजार. तुमचे लाईनमन दादागिरी करायला लागेलत, न सांगताच लाईन कापत आहेत. तुमच्या बँका अजुनही शेतकर्‍यांना पीककर्ज द्यायला तयार नाहीत. मग किमान नक्षलवादी होण्याची परवानगी तरी द्या, असे या पत्रात पतंगे यांनी म्हटले आहे. निसर्गाने शेतकर्‍याच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे. तुम्ही सांगितलेलं की पाच एकरासाठी २0 हजार रुपये देऊत पण प्रशासनाने आमच्या हाती नऊ, पाच हजार देऊन आमची बोळवण केली. महावितरणचे अधिकारी वीज कापण्यासाठी येत आहेत. आता गुरांना पाणी देण्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. प्रशासनाने अशी भयान परिस्थिती करुन ठेवली आहे की आता नक्षलवादी होण्याशिवाय काहीही पर्याय उरलेला नाही, असे पतंगे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. पतंगे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राच्या शेवटी त्यांनी स्वत:ची ओळख तुमच्या महाराष्ट्रातील एक अभागी शेतकरी, अशी करुन दिली आहे. मागील काही महिन्यांमध्ये शेतकर्‍यांवर एका मागून एक नवीन संकट येत आहेत खरिपाचा हंगाम सुरू झाला तेव्हा पावसाने दिलेला ताण. त्यानंतर पुन्हा झालेली अतवृष्टी यामध्ये शेतकर्‍याचे मोठे नुकसान झाले आहे. पंचनामे करुन नुकसानभरपाई देण्यात आली मात्र झालेल्या नुकसानासमोर मिळालेली रक्कम अगदीच शुल्लक होती. पीक विमा, बियाण्यांचा प्रश्न असे अनेक प्रश्न शेतकर्‍यांसमोर आहेत. त्याच आता महावितरणाने आक्रामक पवित्रा घेत वीज बिलांसाठी वीज कापण्याची भूमिका घेतली असून शेतीबरोबरच जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण होण्याच संकट त्यांच्यासमोर आहे. त्यामुळेच नामदेवसारख्या शेतकर्‍याने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.