• Tue. Sep 26th, 2023

मालमत्ता

ByGaurav Prakashan

Feb 15, 2021

तो अजूनही शांतच होता. तसा त्याचा संयम तुटायला लागला होता. परंतू तो अजूनही धीर धरुन होता. मात्र तो जरी संयम बाळगून असला तरी त्याला त्याच्या संयमाचा केव्हा स्फोट होईल ते काही सांगता येत नव्हते. अक्षय त्याचं नाव होतं. अक्षय थोडा हूशारच होता. तसा थोडासा श्रीमंतही. पण त्याला आपल्या श्रीमंतीचा गर्व नव्हता. तो तर चूप होता. अक्षयजवळ मालमत्ता होती. तो मालमत्तेला आपल्या शरीरापेक्षाही जास्त जपत होता. एरवी सर्व मालमत्ता ह्या सुरक्षीत होत्या. पण अक्षयची अशीही एक मालमत्ता, जी थोडी समस्येत होती. त्याच्या जागेत शेजारच्या माणसानं घर बांधलं होतं. त्यानं जणू मोजमाप न करता बांधकाम केलं होतं. आज तेच बांधकाम त्याच्या जागेत असल्यानं अक्षयला तोडायचं होतं. पण शेजारचा व्यक्ती ते बांधकाम तोडत नसल्यानं तो परेशान होता. अक्षय सुशिक्षीतही होता. त्याचबरोबर पैशानं सपन्नच होता. पण तो विचारी असल्यानं चूप होता. त्याचं कारणंही तसंच होतं. ते म्हणजे शेजारच्या माणसाची लहान लहान मुलं होती. ती मुलं आज एवढी लहान होती की घराची भिंत जर तोडली असती तर कदाचित ते कुटूंब रस्त्यावर आलं असतं. म्हणून मानवतेच्या दृष्टीकोणातून विचार करुन अक्षय त्या भिंतीबाबत त्या व्यक्तीवर कोणतीच कारवाई करीत नव्हता. आज एक महिना होवून गेला होता. एका महिण्याच्या कालावधीत अक्षय फारच परेशान झाला होता. त्याने कित्येक वेळा त्या माणसाला सुचना देवून पाहिल्या. परंतू त्या सुचना काही केल्या शेजारच्या माणसानं ऐकल्या नाहीत. म्हणून शेवटी संयम तुटला.
शेजारील माणसाचं नाव कृणाल होतं. कृणाल गरीब होता. पण हेकड होता. तो सतत दारु प्यायचा. सतत नशेमध्ये धृत असायचा. तो सकाळीच कामाला जायचा. त्यातच रात्री तो घरी यायचा तेही दारु पिवून. कोणाचीही त्याचेशी बोलण्याची हिंमत व्हायची नाही. पण अक्षयला आपली जागा मिळवायची होती. कृणालचं सतत असणारं आश्वासन. या आश्वासनाला बळी पडून त्याच्या इवल्या इवल्या चिमणीगत मुलांसाठी मानवता जपत अक्षय चूप राहिला खरा. पण आता त्याचा संयम तुटला होता. शेवटी त्यानं पक्का विचार केला. त्यानं कृणालची पोलिसस्टेशनला शिकायत करण्याची योजना आखली.अक्षयनं त्या मालमत्तेबाबतच्या वादाची तक्रार पोलिसस्टेशनला टाकली. पोलिसांनी दोघांनाही पोलिसस्टेशनला बोलावले. पण पोलिसस्टेशनला त्यावर तोडगा निघालाच नाही. त्यांनी त्या दोघांनाही कोर्टात जायला लावलं. अक्षय सुशिक्षीत होता, त्याचबरोबर श्रीमंतही. तसा कृणाल अशिक्षीत आणि गरीबही. तसंच त्याचं त्या जागेवर कच्च बांधकाम होतं. परंतू कृणाल हा अरेरावीनं गेला. त्याला वाटलं अक्षय काहीच करु शकणार नाही. म्हणून तो अक्षयला चिल्लर समजत राहिला. शेवटी अक्षयनं आव ताव न पाहता तो खटला न्यायालयात नेला. न्यायालयात अक्षय आणि कृणालचा वाद गेला. वादावर फैरी झडू लागल्या. अक्षयनंही दमदार वकील आपल्या खटल्यासंदर्भात नियुक्त केला. तसेच कागदोपत्रीही अक्षयचं लिहिलेलंच होतं.अक्षयनं वकीलांकरवी आपली केस एवढी मजबूत बनवल की त्या केसवर त्यानं एवढ्या दिवसापासून वापर करीत असलेल्या जागेचा पैसाही मागीतला. तसेच न्यायालयात जायला बाध्य केल्याबद्दल न्यायालयात जायचा पैसाही मागीतला.
न्यायालयानं शेवटी निकाल दिला. त्यात म्हटलं की ही जागा कायद्यानुसार कृणालची नसून अक्षयची आहे.अक्षयनं ती आधीच मोजून घेतली होती. ती जागा जाणूनबुजून मोजून न घेता जबरदस्तीनं कृणालनं वापरली. त्यामुळं कृणालनं त्याचा मुवावजा अक्षयला द्यावा. तसेच व्यतिरिक्त न्यायालयात येण्यासाठी जो काही पैसा अक्षयला लागला असेल, तोही तपशालवार द्यावा. अक्षयने तशी खर्चाची यादी न्यायालयाला सादर करावी. सदर खर्चाची रक्कम कृणालनं न्यायालयात भरावी. जर ही रक्कम कृणालनं न्यायालयात न भरल्यास वा अक्षयला न दिल्यास न्यायालय कृणालवर दंडात्मक कार्यवाही करण्यासाठी पात्र ठरेल. त्यातच कृणालला दहा हजार रुपये दंड व दोन वर्ष सक्तमजूरीची शिक्षा देईल. त्यासाठी कृणालनं तयार असावं. निकाल लागला होता. अक्षय खुश होता. तसं त्या निकालाचं विवरण वर्तमानपत्रात छापून आलं होतं. काही लोकं त्यावर प्रतिक्रिया देतांना म्हणत होते की न्याय श्रीमंतांच्या बाजून झुकला. पण ते वास्तविक खरं नव्हतं. कारण न्याय ख-यांच्या बाजूनं झुकला होता. अक्षयचा हक्क न्यायीक असल्यानं त्याचा त्याला मिळाला होता तेही दंडासहित. कृणाल गरीब होता. त्याला वकीलाचं शुल्क पेलवलं नाही. त्यातच आता अक्षयच्या खटल्याला चालविण्यासाठी जो काही खर्च आला होता. तोही द्यावा लागणार होता. कृणालजवळ आता पाहिजे तेवढा पैसाही नव्हता. त्याला न्यायालयानं आखून दिलेला पैसा भरायचा होता. नाहीतर दंड व शिक्षेची तरतूद होती. कृणाल दंडाला घाबरलाही नसता. पण ती मुआवजाची रक्कम व खटल्याचा खर्च न दिल्यास जी शिक्षेची तरतूद होती. ती तरतूद कृणालला घातक होती. त्यामुळं की काय, कृणालनं घर विकलं व ती सर्व रक्कम मुआवज्यासह भरली आणि तो दूसरीकडे किरायानं राहायला गेला.
आज कृणाल पश्चाताप करीत होता. परंतू आज पश्चाताप करुन काही उपयोग नव्हता. कारण वेळ निघून गेली होती. त्याला आता विचार होता की जर त्यानं त्याचवेळी अक्षयची तीन फुट जागा दिली असती तर आज त्याला हे दिवस पाहायला मिळाले नसते. न्यायालयाचा तो निकाल आज एक इतिहास बनला होता. त्यानंतर मालमत्तेसंबंधी खटलेही कमी झाले होते. कारण त्यानंतर जेही खटले न्यायालयात येत. त्या खटल्यावर प्रतिपक्ष वकील याच खटल्याचा हवाला प्रत्यक्ष पुरावा म्हणून देत. त्यावर न्यायाधीशही अशाच प्रकारचे निर्णय देत. त्यामुळे शक्यतोवर कोणीही कोणाची जागा दाबू पाहात नव्हते वा कोणीही कोणाला विनाकारण मालमत्तेसाठी त्रास देत नव्हते. मग एक फुट जागा का होईना……..प्रत्येकातील अक्षय जागा होत होता. एक फुट जागेसाठी लढायला नव्हे तर आपला हक्क मिळवायला. ज्या स्वार्थी जगात कृणालसारखी माणसं अस्तित्वात होती.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
    अंकुश शिंगाडे
    नागपूर
    ९९२३७४७३९२