हैद्राबाद : गाढवाचे मांस खाल्ल्याने आरोग्याला फायदा होतो असा समज असल्याने देशातील काही भागांमध्ये गाढवाच्या मांसाला मागणी आहे. या कारणामुळेही गाढवांची संख्या कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या (एफएसएसए आय) सांगण्यानुसार गाढवाचे मांस हे खाण्यासाठी वापरु शकत नाही.
गाढवाचे मांस खाणे कायद्यानुसार चुकीचे आहे. याचसंदर्भात आता आंध्र प्रदेशमध्ये तपास सुरु असल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे. सामान्यपणे कुठल्याही बांधकामाच्या ठिकाणी किंवा रस्त्यावर दिसून येणारे गाढव हा देशातील नामशेष होणार्या प्राण्यांच्या यादीत गाढवाचा समावेश करण्यात आला आहे. गाढवांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जात असल्याने ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
प्राणीमित्र म्हणून काम करणार्या गोपाल आर. सुरबथुला यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना, गाढवाचे मांस प्रकासम, कृष्णा, पश्चिम गोदावरी आणि गुंटूर जिल्ह्यांमध्ये खाल्ले जाते.
दर गुरुवारी आणि रविवारी येथे गाढवाच्या मांसाची मोठ्या प्रमाणात विक्री होते. अनेक सुशिक्षित लोकंही हे मांस विकत घेताना दिसतात. या मांसांसाठी आठवड्याला १00 हून अधिक गाढवांना ठार केले जाते, अशी माहिती दिली.
आंध्रमधील काही ठिकाणी गाढवाचे मांस खाल्ल्याने कंबरदुखी, अस्थमा आणि श्वसनाच्या आजारासंदभार्तील व्याधींपासून आराम मिळतो असा समज आहे. तसेच लैंगिकशक्ती वाढवण्यासाठीही गाढावाचे मांस फायद्याचे असल्याचे समजले जाते.
गाढावांचे मांस विकण्याच्या या बेकायदेशीर व्यापारामध्ये सहभागी असणार्या व्यक्तींकडून कर्नाटक, तामिळनाडू आणि महाराष्ट्रामधून ही गाढवे मागवण्यात येतात. या प्रकरणामध्ये प्राणीमित्रांनी आता तक्रार दाखल केली असून दुसर्या राज्यांमधून आणण्यात येणार्या प्राण्यांसंदर्भातही चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे. सुरबथुला यांनी दिलेल्या माहितीनुसार गाढवाचे मांस ६00 रुपये किलोने विकले जाते.
आंध्र प्रदेशच्या पशुपालन विभागाच्या सहाय्यक निर्देशक धनलक्ष्मी यांनी गाढवांची कत्तल करणे कायद्याने गुन्हा असल्याचे सांगत यासंदर्भात आपल्याकडे गाढवांची कत्तल आणि त्याच्या मांसाचा काळाबाजार होत असल्याच्या अनेक तक्रारी आल्याचेही त्यांनी सांगितले आहे.