• Mon. Sep 25th, 2023

महिला माहेरच्या व्यक्तीला आपली संपत्ती देऊ शकते

ByGaurav Prakashan

Feb 26, 2021

नवी दिल्ली : एक विधावा महिला आपल्या माहेरच्या व्यक्तीला वारस म्हणून आपल्या मालकीची संपत्ती देऊ शकते असे संपत्ती संदर्भातील एका प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय देताना म्हटले आहे.
न्यायालयाने हिंदू सक्सेशन अँक्टअंतर्गत कायदेशीर भाषेत हिंदू विधवा महिलेच्या माहेरच्या लोकांना अनोळखी म्हणता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे. तसेच या व्यक्तींना महिला तिच्या इच्छेप्रमाणे तिच्या मालकीची संपत्ती सोपवू शकते, असेही म्हटले आहे. गुरुग्राममधील एका कौटुंबिक प्रकरणासंदर्भातील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
या खटल्यामध्ये हिंदू महिलेने पतीकडील संपत्तीच्या वारसांमध्ये माहेरच्या व्यक्तींचा वारस म्हणून समावेश केला होता. महिलेच्या या निर्णयाविरोधात तिच्या दिराने आणि त्याच्या मुलांनी न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती.न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार कोणत्याही महिलेच्या माहेरच्या व्यक्तींना तिच्या कुटुंबाचा भागच समजण्यात यावे. कलम १५ (१)(ड) चा उल्लेख करत न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यामूर्ती आर. सुभाष रेड्डी यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने हा निकाल दिला आहे.
महिलेने आपल्या कौटुंबिक वादामध्ये आपल्या भावाच्या मुलांना वारस म्हणून जाहीर केले होते. या निर्णयाला या महिलेच्या दिराने विरोध केला होता. दिराच्यावतीने त्यांच्या मुलांनी याचिका दाखल करुन वारस म्हणून भावाच्या मुलांचा सहभाग केला जाऊ नये अशी मागणी केली होती. गुरुग्राममधील बाजिदपूर तहसीलमधील गढीगावातील हे प्रकरण आहे.
या गावातील ग्रामस्थ असणार्‍या बदलू यांना राम आणि शेर सिंह ही दोन मुले आहेत. १९५३ साली शेर सिंह यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांची पत्नी जगनो यांनी आपल्या वाट्याची जमीन भावाच्या मुलांच्या नावे केली.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!