औरंगाबाद : राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून ठिकठीकाणच्या स्थानिक राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. कधी काळी मित्र असलेले पक्ष आता विरोधात असल्याने सत्तेची समीकरणे बदलली आहेत. त्यामुळे औरंगाबाद जिल्हय़ातही जुन्या नेत्यांना संधी देण्यापेक्षा नवीन चेहर्यांना संधी मिळाल्यास शिवसेनेत नव्या दमाचे नेतृत्व विकसित होऊ शकेल. असा विचार शिवसेनेत पुढे येत आहे. त्यामुळे होऊ घातलेल्या मनपा निवडणुकीसाठी शिवसेनेची जोरदार तयारी सुरू आहे.
राज्यात महाविकास आघाडी सरकार असले तरीही ऐनवेळी या तिघाडीत बिघाड निर्माण झाला तर स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी शिवसेना करत आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून मोठय़ा प्रमाणावर तयारी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर रविवारी मध्य मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी,लोकप्रतिनिधी यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. तर सोमवारी पश्चिम मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांची बैठक ठेवण्यात आली आहे. मंगळवारी पूर्व मतदारसंघातील इच्छुक उमेदवार, लोकप्रतिनिधींची बैठक ठेवण्यात आली आहे.
येणारे तीन दिवस एकाचवेळी वॉर्ड निहाय बैठका आयोजिण्यात आल्या असून, सर्व शिवसेना, महिला, युवक अन्य अंगीकृत संघटना उपशाखा, गट, सहगट, आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी, मनपा इच्छुक सर्व शिवसैनिकांनी उपस्थित राहण्याच्या सूचना शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी केल्या आहेत. या बैठका संबधित विभागाचे उपशहरप्रमुख व शाखाप्रमुख आयोजित करणार आहेत. या बैठकीस अन्य ठिकाणचे पदाधिकारी निरीक्षक म्हणुन उपस्थित राहतील.
मनपा निवडणुकीसाठी शिवसेनेची औरंगाबादमध्ये तयारी सुरू
Contents hide