• Mon. Sep 25th, 2023

बिटाचे आरोग्यदायी लाभ

ByGaurav Prakashan

Feb 27, 2021

सध्या आपल्या जीवनशैलीमध्ये मधुमेह हा शब्द अगदी सख्या मित्रासारखा समाविष्ट झाला आहे. मधुमेहानं ग्रस्त असणार्‍यांची संख्या वाढतेच आहे. व्यायाम आणि आहार ही दोन पथ्य पाळली तर मधुमेहासह जगणं काही अंशी सुकर होतं. पण या व्याधीची दखल घेऊन आहारात काही बदल घडवून आणायला हवेत. मधुमेह नियंत्रीत करणार्‍या काही घटकांचा आहारात समावेश केला तर हे काम सुकर होईल. या प्रयत्नात आहारात बीटाचं सेवन वाढवणं उपयुक्त ठरेल. बीट कच्च्या अथवा उकडलेल्या स्वरूपात खाता येतं. भाजी, कोशींबीर, सूप अथवा सॅलेड स्वरूपात बीटाचं सेवन करता येतं. यामध्ये अत्यंत कमी कॅलरीज असतात. त्यामुळे बीटाच्या सेवनानं चरबी वाढण्याचा धोका नसतो. यात साखरेचं प्रमाण असलं तरी साखर हळूहळू रक्तामध्ये मिसळते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढण्याचा धोका रहात नाही. विशेषत टाईप २ प्रकारचा मधुमेह असणार्‍यांना बीटाचं सेवन लाभकारक ठरते. म्हणूनच स्वस्थ रहाण्यासाठी आहारात या उपयुक्त घटकाला प्राधान्य द्यायला हवं. बीटाचा ज्यूसदेखील आरोग्यरक्षणाचं काम करतो. या रसात शरीरातील विषारी तत्त्व बाहेर काढून टाकण्याची क्षमता आहे. नियमितपणे बीटज्यूस घेण्याचं पथ्य पाळलं तर कधीच थकवा जाणवणार नाही. बीटाच्या सेवनानं पचनशक्ती सुधारते. यामध्ये फायबरची मुबलक मात्र आढळून येते. मधुमेहींसाठी ही बाब अत्यंत महत्त्वाची असते. या भाजीच्या सेवनानं मधुमेहींनाच फायदा होतो असं नव्हे तर उच्च रक्तदाबाचा त्रास असणार्‍यांनाही याचे लाभ अनुभवायला मिळतात. एकूणच निष्कर्ष हा आहे की मधुमेह असो अथवा नसो आहारात बीटाचा समावेश असायला हवा.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!