• Sun. Jun 4th, 2023

बालकांना पोलिओ डोजऐवजी पाजले सॅनिटायजर.!

ByGaurav Prakashan

Feb 2, 2021

यवतमाळ : ‘दो बुंद जिंदगी के, अब पोलियो फ्री होगा भारत, असे आवाहन करीत रविवारी पल्स पोलियो मोहिमेला देशात सर्वत्र सुरुवात झाली, परंतु हेच ‘दोन बुंद’ आता आरोग्य कर्मचार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे जीवघेणे ठरत आहेत. यवतमाळ जिल्ह्य़ात आरोग्य कर्मचार्‍यांनी हलगर्जीपणामुळे १२ बालकांना पोलियो डोजऐवजी सॅनिटायजर पाजल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या बालकांमध्ये एक ते पाच वयोगटातील मुले आहेत. या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी रुग्णालयात भेट देऊन बालकांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
गिरीश किसन गेडाम, योगीश्री किसन गेडाम, अंश पुरुषोत्तम मेर्शाम, हर्ष पुरुषोत्तम मेर्शाम, भावना बापूराव आरके, वेदांत नितेश मेर्शाम, राधिका नितेश मेर्शाम, प्राची सुधाकर मेर्शाम, तनुज राम गेडाम, निशा प्रकाश मेर्शाम व आस्था प्रकाश मेर्शाम, अशी सॅनिटायझर पाजण्यात आलेल्या बालकांची नावे आहेत.
भंडारा रुग्णालयातील अग्निकांडात अशाच हलगर्जीपणामुळे १0 बालकांचा बळी गेला. ही घटना ताजी असतानाच चिमुकल्यांच्या आरोग्याबाबत अक्षम्य हलगर्जीपणाची आणखी एक घटना रविवारी दि. ३१ जानेवारीला यवतमाळ जिल्ह्यात समोर आली आहे. पोलिओ लसीकरणाच्या वेळी पोलियो डोज ऐवजी सॅनिटायजर पाजल्यामुळे १२ चिमुकल्यांची प्रकृती बिघडली. बालकांना उलटीचा त्रास झाल्याने ही गोष्ट पालकांच्या लक्षात आली. त्यामुळे रविवारी रात्रीच १२ बालकांना रुग्णालयात भरती करण्यात आले. घाटंजी तालुक्यातील भांबोरा प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत कापसी कोपरी येथे हा प्रकार घडला असून या
चिमुकल्यांना यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बालकांना लस म्हणून सॅनिटाझर पाजण्यात आले हे केंद्रावरील कर्मचार्‍यांच्या लक्षात येताच त्यांनी काही वेळाने त्या सर्वांना पोलियो लस दिली. घटना घडल्यानंतर उशिरापयर्ंत वरिष्ठ अधिकार्‍यांना घटनेची माहिती दिली गेली नव्हती, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगितले. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *