• Thu. Sep 28th, 2023

बस कालव्यात कोसळून ४५ ठार

ByGaurav Prakashan

Feb 17, 2021

सिधी : मध्यप्रदेशातील कालव्यात बस कोसळून झालेल्या भीषण अपघातात ४५ प्रवाशांनी आपला जीव गमावला असून अनेक प्रवाशांची मृतदेह वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अपघातातून सात जणांना वाचविण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली आहे. जवळपास ६0 प्रवासी असलेली ही बस सकाळी ७.३0 वाजता कालव्यात कोसळली.
घटनास्थळी डॉक्टर आणि रुग्णवाहिकादेखील पाठवण्यात आल्या होत्या अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. ही अत्यंत दुख:द घटना आहे. बचावकार्य आधीच सुरु आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. स्थानिकांच्या मदतीने तात्काळ बचावकार्य सुरु करण्यात आले होते. दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत दिली जाणार आहे. संपूर्ण राज्य पीडितांच्या दुखात सहभागी आहे, असे शिवराज सिंग यांनी व्हिडीओ मेसेजमध्ये म्हटले आहे.
दुर्घटनेनंतर राज्य सरकारने सर्व महत्त्वाचे कार्यक्रम रद्द केले आहेत. यामधील एका कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित राहणार होते. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या एक लाख घरांच्या लाभार्थ्यांसोबत अमित शहा सकाळी ११ वाजता संवाद साधणार होते.
चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. बस सतनाच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ७.३0 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर सात प्रवासी पोहत बाहेर आले. कालवा ३0 फूट खोल असल्याने पूर्ण बसच त्यात बुडाली होती. क्रेनच्या सहाय्याने बस बाहेर काढण्याचे काम सुरु करण्यात आले होते.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!