• Mon. Jun 5th, 2023

प्रियंका गांधींच्या मोटारीच्या ताफ्याला अपघात : थोडक्यात बचावल्या

ByGaurav Prakashan

Feb 5, 2021

रामपूर : काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव प्रियंका गांधी उत्तर प्रदेशमधील रामपूरच्या दौर्‍यावर गेलेल्या असताना त्यांच्या मोटारीच्या ताफ्याला अपघात झाल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिले आहे.या वृत्तानुसार प्रियंका यांच्या ताफ्यातील चार गाड्या एकमेकांना धडकल्या. सुदैवाने या अपघातामध्ये प्रियंका थोडक्यात बचावल्या असून त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. हा अपघात हापुड महामार्गावर गढमुक्तेश्‍वरजवळ झाला.
प्रियंका गांधी यांच्या ताफ्यातील गाड्या रामपूरच्या दिशेने महामार्गावर वेगाने रामपूरच्या दिशेने जात असतानाच अचानक प्रियंका गांधी ज्या गाडीत बसल्या होत्या ती गाडी तापल्याने तिच्या बोनेटमधून धूर येऊ लागला. त्यामुळे गाडी चालकाने अचानक ब्रेक दाबून गाडी थांबवली. गाडी अचानक थांबल्याने ताफ्यामध्ये मागून येणार्‍या गाड्यांनी प्रियंका बसलेल्या गाडीला धडक दिली. ताफ्यामधील चार गाड्या एकमेकांना आदळल्या. मात्र या अपघातामध्ये कोणालाही दुखापत झालेली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
दिल्लीत शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या २६ जानेवारी रोजी हिसेंमध्ये मृत्यू झालेल्या नवरीत सिंह या शेतकर्‍याच्या कुटुंबियांना भेट देण्यासाठी प्रियंका गांधी उत्तर प्रदेशचे काँग्रेस अध्यक्ष अजय कुमार लल्लू, विधीमंडळाचे नेते आराधना मिश्रांसहीत अनेक नेते आणि कार्यकर्त्यांबरोबर साडेअकराच्या सुमारास ११ वाजता बिलासपूर येथील डिबडिबा गावाला भेट देणार आहेत. दिल्लीतील आयकर विभाग कार्यालयासमोर ट्रॅक्टर उलटल्याने नवरीतचा मृत्यू झाला. नवरीतचा मृत्यू गोळीबार केल्याने झाल्याचा आरोप आधी शेतकरी आंदोलकांनी केला होता. मात्र शवविच्छेदनाच्या अहवालामध्ये नवरीतला गोळी लागली नसल्याचा खुलासा झाला. प्रियंका यांच्या दौर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर रामपूर जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पोलीस आणि प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रियंका आणि काँग्रेस सर्मथकांच्या ५00 गाड्यांचा ताफा असू शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे. एसपी शगुन गौतम यांनी केवळ रामगोविंद चौधरीच येणार असल्याची माहिती देण्यात आल्याचे म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *