• Thu. Sep 28th, 2023

पोहरादेवी गर्दी : राठोड, महंतांऐवजी पोलिसांना विचारण्यात आला जाब

ByGaurav Prakashan

Feb 27, 2021

मुंबई : राज्यभर गाजत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे वादात सापडलेले वनमंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे केलेल्या शक्तीप्रदर्शनादरम्यान झालेल्या गर्दीचे खापर आता पोलिसांवर फोडण्यात आल्याचे वृत्त आहे. पोहरादेवी येथे २३ फेब्रुवारी रोजी झालेल्या गर्दीसंदर्भात आता पोलिस महासंचालकांनी वाशीम पोलिसांनाच जाब विचारल्याचे वृत्त आहे. पोहरादेवी येथे झालेल्या गर्दीसाठी संजय राठोड अथवा पोहरादेवी येथील महंतांऐवजी पोलिसांनाच जाब विचारण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी गर्दी करू नये व कुठलाही कार्यक्रम न घेण्याचे जाहीर आवाहन केले होते. मात्र, त्यांच्याच मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला केराची टोपली दाखवत पोहरादेवी येथे नियमांना तिलांजली दिली. या प्रकरणी जोरदार टीका झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. वाशीम पोलिसांनी १0 जणांसह या ठिकाणी उपस्थित असलेल्या ८ ते १0 हजार लोकांवर गुन्हा दाखल केला. यामध्ये मंत्र्यांचा समावेश नाही. या प्रकरणात पोलीस देखील कोंडीत सापडले आहेत.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जमावबंदीचा आदेश असल्याने पोलिसांनी अगोदरच नोटीस बजावल्या होत्या. तरीही कायदा व नियमाला झुगारून हजारो सर्मथक पोहरादेवी येथे एकत्र आले. आता कारवाई करावी कुणावर? असा पेच पोलिसांपुढे निर्माण झाला. अखेर त्यांनी हजारो लोकांवर गुन्हा दाखल करून वेळ निभावून नेली. पोहरादेवी येथील गर्दीसाठी कोण जबाबदार हे उघड गुपित आहे. त्यांच्यावर नेमकी कारवाई होणार का? हा खरा प्रश्न आहे. असं असतानाच आता थेट पोलिसांनाच या गर्दीसंदर्भात जाब विचारल्याची माहिती सुत्रांच्या हवाल्याने समोर येत आहे.

पोहरादेवीच्या मार्गावर अनेक ठिकाणी पोलिसांनी अडवून लोकांना परत पाठवले. तरीही असंख्य लोकांनी रस्त्याने न येता शेताने चालत जाऊन पोहरादेवी गाठले. कोरोनाचा कहर सुरू असतांनाही हजारो लोक येथे एकत्र आले होते. वाशीमचे जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोहरादेवी येथील गर्दी प्रकरणात १0 जणांसह ८ ते १0 हजार लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रत्यक्ष घटनास्थळाच्या छायाचित्रणाची तपासणी करण्यात येत आहे. प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.