• Fri. Jun 9th, 2023

पर्यटनातून सर्वांगीण विकास साधणार – मुख्यमंत्री

ByGaurav Prakashan

Feb 13, 2021

पालघर : पर्यटनाच्या दृष्टीने जिल्ह्याची भौगोलिक रचना अनुकूल असून जिल्ह्याला विस्तीर्ण सागरी किनारा लाभला आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी पर्यटन स्थळांचा विकास करणे आवश्यक असल्याने पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास साधणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पालघर जिल्ह्याच्या दौर्‍यावर होते त्यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नव्याने जिल्हा अस्तित्वात आल्याने जिल्ह्यासाठी लागणार्‍या आवश्यक सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक तसेच जिल्हा परिषदेच्या इमारतीचे काम लवकरच पूर्ण होऊन नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे. कुपोषण पूर्णपणे थांबवायचे असल्याने जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करणार असून आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणून पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
जिल्ह्याला समुद्र किनारा लाभला आहे. तसेच जिल्ह्यात हिल स्टेशन तसेच नैसर्गिक संपदा लाभल्याने पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पर्यटन स्थळांचा विकास करण्यात येणार आहे. आदिवासी संस्कृती व परंपरा जपून समाजाचा विकास करण्यावर शासनाचा भर आहे. जिल्ह्यात दळणवळण, रोजगार, पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. यावेळी जव्हार तालुक्यातील जामसर प्राथमिक आरोग्य केंद्राची देखील मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पाहणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *