• Mon. Sep 25th, 2023

नीरव मोदीसाठी ऑर्थर रोड जेल सज्ज

ByGaurav Prakashan

Feb 27, 2021

मुंबई : पंजाब नॅशनल बँकेतील १४ हजार कोटींच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी फरार हिरे व्यापारी नीरव मोदी याचे भारताकडे प्रत्यार्पण होण्याची शक्यता आहे. नीरव मोदी याने भारतातील न्यायालयात खटल्याला सामोरे जावे असे हे प्रकरण असून, त्याच्याविरुद्ध तेथे निष्पक्ष सुनावणी होणार नाही हे सिद्ध करणारा कुठलाही पुरावा नाही, असा निर्णय ब्रिटनमधील एका न्यायालयाने गुरुवारी दिला. यामुळे नीरव मोदीच्या प्र्त्यापणाचा मार्ग मोकळा झाला असून मुंबईमधील आर्थर रोड जेलमध्ये त्यासाठीची पूर्ण तयारी करण्यात आल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, नीरव मोदीसाठी आर्थर रोड जेलमध्ये विशेष कोठडी असणार आहे.
कारागृह अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, नीरव मोदीला मुंबईत आणल्यानंतर त्याला बराक क्रमांक १२ मधील एका कोठडीत ठेवण्यात येणार आहे. या कोठडीला कडक सुरक्षाव्यवस्था असणार आहे. नीरव मोदीला जेलमध्ये ठेवण्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. जेव्हा कधी त्याचे प्रत्यार्पण होईल तेव्हा कारागृह आणि कोठडी तयार आहे, असे अधिकार्‍याने सांगितले आहे.
२0१९ मध्ये महाराष्ट्र कारागृह विभागाने केंद्राला नीरव मोदीला ठेवण्यासाठी कारागृहाची स्थिती आणि सुविधांची माहिती दिली होती. न्यायालयात सुनावणी सुरू असताना केंद्राने नीरव मोदीच्या प्र्त्यापणासाठी महाराष्ट्राच्या गृह मंत्रालयाकडून सविस्तर माहिती मागवली होती.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

कारागृह प्रशासनाने नीरव मोदीला ठेवले जाणार आहे त्या कोठडीत कैद्यांची संख्या कमी असेल असे आश्‍वासन दिले आहे. मोदीला जेलमध्ये कॉटनची चटई, उशी, बेडशीट आणि ब्लँकेट पुरवले जाणार असून तीन चौरस मीटरची जागा वापरण्यासाठी मिळेल अशी माहिती अधिकार्‍याने दिली आहे. याशिवाय कोठडीत पुरेसा प्रकाश, व्हेंटिलेशन असेल आणि सामान ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली जाईल असेही सांगितले आहे.