• Mon. Sep 25th, 2023

निसर्गाचा करिश्मा

ByGaurav Prakashan

Feb 20, 2021

निसर्गाचा करिश्मा अजब आहे. आता हेच बघा ना. साधं पाच दहा मीटर खोल विहिरीतून पाणी काढायचं तर विजेचा पंप बसवावा लागतो. मग मुळांशी घातलेलंपाणी ताडमाड उंच असणार्‍या माडाच्या शेंड्यापर्यंत कसं पोहोचतं? जंगलांमध्ये देवदारसारखे वृक्ष तर शंभर मीटर उंची गाठतात. त्यांनाही मुळाजवळचं पाणी पुरतं. निसर्गाच्या दोन करामतींचा यात वाटा आहे. पहिला म्हणजे या झाडांमध्ये झायलेम या नावानं ओळखल्या जाणार्‍या द्रववाहिन्या असतात. त्या या झाडांच्या जीवनवाहिन्याच असतात. त्यांचा घेर साधारणपणे एका मिलिमीटरच्या एक दशांश इतकाच असतो. मुळांपाशी घातलेलं पाणी या नलिकांमधून वर चढत जातं. पाण्याने भरलेल्या ग्लासामध्ये एखादी स्ट्रॉ ठेवली तर तिच्यातही पाणी असं वर चढत जाताना दिसतं. यालाच केशाकर्षण किंवा कॅपलरी अँक्शन असं म्हणतात. त्यात झाडांच्या पानांमधून पाण्याचं बाष्पीभवन होत असल्यानं भरच पडते. आपल्याला घाम येतो आणि अंगातल्या पाण्याचं बाष्पीभवन होऊन ते हवेत उडून जातं, तसंच झाडांच्या पानांमधून पाणी बाहेर पडून ते उडून जात असतं. त्यामुळे पानांजवळ पाण्याचं प्रमाण अतिशय कमी असतं. उलट मुळांपाशी ते कितीतरी जास्त असतं. त्यामुळे एकप्रकाराचा पंप तयार होऊन मुळांपासून पानांपर्यंत असा पाण्याचा एक प्रवाहच तयार होतो. या नलिकांमधून पाणी वर ओढलं जातं आणि पार शेंड्यापर्यंत पोहोचतं.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!