• Sat. Sep 23rd, 2023

नवे कृषी कायदे बंधनकारक नाही

ByGaurav Prakashan

Feb 11, 2021

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी लोकसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणासंदर्भात आभारप्रदर्शक भाषण दिलं. या भाषणामध्ये पंतप्रधान मोदींनी कोरोनाविरोधातील लढाईपासून ते नवीन कृषी कायद्यांची आवश्यकता का आहे यासंदर्भात सविस्तर भाषण दिले. यावेळी पंतप्रधान मोदींनी शेतकर्‍यांच्या भल्यासाठीच आम्ही नवीन कृषी कायदे आणले असून ते बंधनकारक नाही, असे नमूद केले. त्याचप्रमाणे शेतकर्‍यांचे भले करण्यासाठीच आम्ही प्रयत्न करत असून नवीन कायद्यांमुळे एक नवी पर्यायी व्यवस्था उभी राहील असा विश्‍वास मोदींनी व्यक्त केला. यावेळी मोदींनी कृषी क्षेत्रामध्ये नव्याने बदल करण्याची आताच गरज असल्याचेही सांगितले.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

भाषाणाच्या सुरवातीपासूनच पंतप्रधानांनी कृषी कायद्यांसदर्भात बोलण्यास सुरुवात केली. यावेळी मोदींनी नवीन कृषी कायदे आल्यापासून देशामध्ये कुठेही कोणतीही कृषी बाजारसमिती बंद झाल्याचे किंवा एमएसपी रद्द झाल्याचे वृत्त नाही, असा उपरोधात्मक टोला विरोधकांना लगावला. देशातील शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन कृषी कायदे अंमलात आणले आहेत. आपला देश आकाराने खूप मोठा आहे. त्यामुळे या नवीन कायद्यांचा अनेक ठिकाणी फायदा होईल काही ठिकाणी म्हणावा तितकासा फायदा झाला नाही तरी पयार्यी व्यवस्था उभी राहील. ही पर्यायी व्यवस्था स्वीकारायची की नाही तो शेतकर्‍यांचा निर्णय असणार आहे. ही पयार्यी व्यवस्था लादली जाणार नाहीय, असेही मोदींनी भाषणामध्ये स्पष्ट केले. शेतकरी स्वत:चे भले ते करु शकले असते तर ते त्यांनी कधीच केले असते. आपण दुसर्‍या हरीत क्रांतीबद्दलही बोललो आहोत. मात्र आता देशातील सर्व राजकारण्यांनी एकत्र येत या कृषी क्षेत्राला उभारी देण्यासाठी ठोस निर्णय घेण्याची गरज आहे, असंही मोदींनी नव्या बदलांची आवश्यकता असल्याचं नमूद करताना सांगितलं. १९ व्या शतकामधील यंत्रणांप्रमाणे आपण २१ व्या शतकामध्ये कृषी क्षेत्राकडे पाहू शकत नाही असेही मोदी यावेळी म्हणाले. कृषी क्षेत्रातील नवीन बदलांच्या माध्यमातून मोठय़ाप्रमाणात रोजगार निर्मिती करता येईल असा विश्‍वासही मोदींनी व्यक्त केला. त्याप्रमाणे कोरोना कालावधीमध्येही कृषी क्षेत्रामध्ये भरघोस उत्पन्न घेण्यात आल्याचं सांगत देशातील कष्टकरी शेतकर्‍याचे भले व्हावे अशीच प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे, असेही मोदी म्हणाले.