• Mon. Sep 25th, 2023

दहावी, बारावी परीक्षांच्या तारखा बदलल्या

ByGaurav Prakashan

Feb 18, 2021

मुंबई : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्व शाळा आणि महाविद्यालये अनेक महिने बंद ठेवण्यात आली. मात्र याच महिन्यामध्ये राज्यातील काही शहरांमधील महाविद्यालये आणि शाळा सुरू करण्यात आल्या. एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच दुसरीकडे परिक्षांचा काळ जवळ येऊन लागल्याने त्यासंदर्भातील पालक आणि विद्यार्थ्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच आता दहावी आणि बारावीच्या परीक्षांसंदर्भात मोठी घोषणा करण्यात आली आहे. दहावी आणि बारावीच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे.
कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव आणि आरोग्यासंदभार्तील नियम लक्षात घेता सालाबादप्रमाणे यंदा नियोजित महिन्यामध्ये परीक्षा न घेता सरकारच्या संमतीने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षांचे वेळापत्रक बदलले आहे. दरवर्षी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये होणार्‍या दहावी बारावीच्या परीक्षा यंदा एप्रिल-मेमध्ये होणार आहेत. बारावीची परीक्षा २३ एप्रिल २0२१ ते २१ मे २0२१ दरम्यान होणार आहे. तर दहावीची परीक्षा २९ एप्रिल २0२१ ते २0 मे २0२१ दरम्यान होणार असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे. मुंबई, कोकण, पुणे, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोल्हापूर या नऊ विभागांमध्ये या परीक्षा एकाचवेळी घेतल्या जाणार आहेत. महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरही नवीन वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!