• Fri. Jun 9th, 2023

थिएटरमध्ये १00 टक्के प्रेक्षक क्षमतेला परवानगीच्या निर्णयाचे श्रेय सनी देओलचे?

ByGaurav Prakashan

Feb 3, 2021

मुंबई : उत्पादन, हॉटेल, पर्यटनाच्या बरोबरीने मनोरंजन क्षेत्रालाही करोना व्हायरसचा मोठा फटका बसला आहे. करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाउन जाहीर करण्यात आला. यामुळे अनेक महिने थिएटर्स बंद होती. अन्य व्यवसाय क्षेत्रे सावरत असताना चित्रपट उद्योग अजूनही पूर्वपदावर आलेला नाही. केंद्र सरकारने सुरुवातीला ५0 टक्के प्रेक्षक क्षमतेने थिएटर उघडण्यास परवानगी दिली. पण याचा वितरक आणि निर्माते दोघांना फायदा झाला नाही.
सरकारने आता थिएटर मालकांना शंभर टक्के प्रेक्षक क्षमतेने थिएटर चालवण्यास परवानगी दिली आहे. सूत्रांच्या मते, सरकारने थिएटरमध्ये १00 टक्के आसने भरण्यास जी परवानगी दिलीय, त्या निर्णयाचे श्रेय अभिनेता आणि खासदार सनी देओलला जाते. सनी देओल थिएटरचा हा विषय संबंधित मंत्र्यांकडे घेऊन गेला. त्यांनी त्याचे म्हणणे ऐकून घेतले व यावर तोडगा काढला.
सनी देओलने चित्रपट सृष्टीतील शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. त्याने अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, अनुराग ठाकूर यांची भेट घेतली. ५0 टक्क्यापेक्षा जास्त १00 टक्के आसने भरण्यास परवानगी द्या अशी विनंती त्याने संबंधित मंत्र्यांना केल्याची माहिती आहे.
सनी देओलने जो पुढाकार घेतला, त्या बद्दल मल्टीप्लेक्स असोशिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष कमल ग्यानचंदानी यांनी त्याचे आभार मानले आहेत. सनी देओल अभिनेता असण्याबरोबरच पंजाबमधून खासदारही आहे. चित्रपट उद्योगाला पूर्वपदावर आणून गती देण्यासाठी सनी देओलने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
सनी देओलच्या नेतृत्वाचाला चित्रपट सृष्टीला फायदा होईल असे कमल ग्यानचंदानी यांनी म्हटले आहे. कोरोनामुळे अनेक मोठय़ा चित्रपटांचे प्रदर्शन रखडले आहे. आता त्यांच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *