• Tue. Sep 26th, 2023

तब्बल सव्वाशे वर्षांनी तिथे पुन्हा साजरी झाली शिवजयंती

ByGaurav Prakashan

Feb 20, 2021

अहमदनगर : नगर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदीरवजा स्मृतीस्थळ आहे. ब्रिटिश राजवटीत १८९७ मध्ये तेथे शिवजयंती साजरी केली म्हणून पाच शिक्षकांना देशद्रोही ठरविण्यात आले होते. त्यांना नोकरीतून काढण्यात आले होते. या ठिकाणी तब्बल सव्वाशे वर्षांनंतर सार्वजिक शिवजयंती साजरी करण्यात आली. कोरोनाच्या निर्बंधांमुळे र्मयादित शिवप्रेमींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला असला तरी येथील उत्सवाला पुन्हा सार्वजनिक स्वरूप मात्र प्राप्त झाले आहे.
येथील अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब फिरोदिया शाळेच्या आवारात हे मंदिर वजा स्मृतीस्थळ आहे. अर्थात हे मंदिर कधी स्थापन झाले, याचा स्पष्ट उल्लेख सापडत नाही; पण १८९८ च्या पुण्यातील प्लेग साथीच्या आधीपासून हे मंदिर असल्याच्या नोंदी सापडतात. आणखी एका नोंदीनुसार १८९७ मध्ये तेथे शिवजयंती उत्सव झाला होता. त्यावेळी माधव हरि मोडक यांनी तेथे भाषण केले होते. या भाषणावरून ब्रिटिशांनी त्यांना देशद्रोही ठरवून गुन्हा दाखल केला होता. यामध्ये सहभागी झाल्याबद्दल त्यांच्यासह गणपतराव दाभोळकर, शिवरामपंत भारदे, बंडोपंत धसे व रंगनाथ निसळ या शिक्षकांना सेवेतून कमी करण्यात आले होते.
पुढे १८९८ च्या प्लेगमध्ये रँडच्या खुनाने राजकीय वातावरण प्रक्षुब्ध झाले. त्याचे पडसाद सर्व महाराष्ट्रभर पसरले. या शिवाजी मंदिराकडेही कोणी लक्ष देईनासे झाले. शिवाजी मंदीर या नावाची आज विर्शामबागेत असलेली लहानशी इमारत अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या ताब्यात आहे. संस्थेतर्फे तेथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पूजाअर्चा होते. आता या उत्सवाला पुन्हा सार्वजनिक स्वरूप देण्यात आले.
स्मायलिंग अस्मिता कष्टकरी, शेतकरी विद्यार्थी संघटनेच्या पुढाकारातून शिवप्रेमेंनी एकत्र येत येथे शिवजयंती साजरी केली. नगर शहराचे पोलिस उपअधीक्षक विशाल ढुमे, नगरसेवक बाळासाहेब पवार, प्रा. सदाशीवराव निर्मळे, संपुणार्ताई सावंत, श्रीपाद दगडे, यशवंत तोडमल, हेमंतराव मुळे, विशाल म्हस्के, श्रेयस सावंत यावेळी उपस्थित होते. कोरोनाचे नियम पाळून हा कार्यक्रम अटोपशीर करण्यात आला. तेथील सार्वजनिक शिवजयंतीची परंपरा पुन्हा सुरू झाली.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!