• Sun. May 28th, 2023

जिल्हाधिका-यांनी केली बांबू गार्डनची पाहणी

ByGaurav Prakashan

Feb 11, 2021

अमरावती : अमरावती येथील बांबू गार्डन हे महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील वैशिष्ट्यपूर्ण उद्यान आहे. शहरालगत विस्तीर्ण क्षेत्रावर पसरलेल्या या गार्डनच्या विकासातून पर्यटनवाढीस मोठा वाव आहे. त्यामुळे येथे नाविन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करून अभिनव उपक्रम राबवावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले.
येथील वडाळी परिसरातील बांबू गार्डनची पाहणी आज जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी केली, त्यावेळी ते बोलत होते. उपवनसंरक्षक चंद्रशेखर बाला यांच्यासह विविध वनाधिकारी यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी यावेळी संपूर्ण उद्यानाची व त्यातील उपक्रमांची पाहणी केली व पर्यटकांच्या प्रतिसादाबद्दल माहिती घेतली.श्री. नवाल म्हणाले की, अमरावती जिल्हा हा निसर्गसंपदेने समृद्ध आहे. त्यातही नैसर्गिक वनांचा वापर करून महानगराजवळ विकसित झालेले बांबू उद्यानाचे महत्व अनन्यसाधारण आहे. जगभरातील बांबूच्या शेकडो प्रजाती येथे पाहायला मिळतात. एकाचवेळी पर्यटनाचा आनंद व निसर्गशिक्षण देणारे हे स्थळ आहे. त्यामुळे या बाबी लक्षात घेऊन त्यानुरूप अभिनव उपक्रम येथे राबवले पाहिजेत.
पर्यटकांना शास्त्रीय माहिती व वृक्षमहात्म्य सांगू शकेल, अशा कुशल गाईडची टीम येथे असणे आवश्यक आहे. बांबूपासून तयार होणा-या विविध वस्तू, साहित्याच्या प्रदर्शनाचा समावेश असावा, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.बांबू उद्यानाकडे येणारा रस्ता हा महामार्गाशी जोडला जावा जेणेकरून पर्यटकांना ये- जा करणे सोयीचे होईल. त्यादृष्टीने नियोजन व आराखडा करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *