• Mon. Sep 25th, 2023

जिल्हय़ात कोरोना प्रतिबंधक कारवायांना वेग

ByGaurav Prakashan

Feb 24, 2021

अमरावती : कोरोना प्रतिबंधासाठी जारी लॉकडाऊनमध्ये नियमभंग करणा-या व्यक्तींवरील कारवाईच्या प्रक्रियेला प्रशासनाकडून वेग देण्यात आला आहे. त्यासाठी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांच्या पथकांकडून सातत्यपूर्ण मोहिम राबविण्यात येत आहे. अंजनगाव सुर्जी येथे लग्नाच्या रिप्सेशनला गर्दी केल्याचे आढळून आल्याने तहसीलदारांनी केलेल्या कारवाईत आयोजकांना २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.कोरोना साथीच्या काळात मास्कचा वापर व इतर नियम न पाळून स्वत:सह इतरांचाही जीव धोक्यात घालणा-या व्यक्तींविरोध कठोर कारवाईचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर व जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले होते. त्यानुसार उपविभागीय व तहसील यंत्रणेकडून पोलीस व नगरपरिषदेच्या समन्वयातून जोरदार मोहिम हाती घेण्यात आली आहे.
कंटेनमेंट झोनमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या शहरालगतच्या परिसराची पाहणी तहसीलदार संतोष काकडे व पथकाने केली. त्याचप्रमाणे, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाची परीक्षा २३ ते २७ फेब्रुवारीदरम्यान चार केंद्रांवर होत आहे. त्यानुषंगाने सिपना अभियांत्रिकी महाविद्यालय, नानीबाई बी. एड. महाविद्यालय, पीसी पॉईंट विद्यापीठ कॅम्प परिसर, विन्सार इन्फोटेक सिटीलँड हब परिसरातील केंद्राची पाहणी तहसीलदारांनी केली. परीक्षा केंद्रांवर अनावश्यक गर्दी होऊ नये यासाठी वेळोवेळी भेटी दिल्या आहेत. शहरातही जिल्हाधिकारी शैलेश नवाल, उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनानुसार विविध परिसरांची पाहणी, तपासणी आदी प्रक्रिया होत असल्याचे तहसीलदार काकडे यांनी सांगितले.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!