अमरावती: जलयुक्त शिवार योजनेत यापूर्वी झालेल्या कामांचे त्रयस्थ संस्थेमार्फत मूल्यमापन करण्यात येईल. त्यानुसार काटेकोरपणे कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे दिले.कृषी विभागांतील विविध कामांचा आढावा जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे, सर्व तालुका कृषी अधिकारी, आत्मा, नाबार्ड आदी यंत्रणांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. नवाल म्हणाले की, जलयुक्त शिवार योजनेत झालेल्या कामांचा दर्जा व समग्र मूल्यमापन त्रयस्थ संस्थेमार्फत करून घेऊन त्याचा अहवाल सादर करावा. पाणलोट विकास कार्यक्रमात क्लस्टरनिहाय कामांना गती द्यावी. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत प्रलंबित प्रकरणांचा वेळेत निपटारा करावा. पात्र व्यक्तींना लाभ मिळण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावे. योग्य माहिती देऊन कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी. प्रकरण प्रलंबित राहता कामा नये. गारपीट व अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांच्या भरपाईबाबत वेळेत पूर्तता करावी. पीक विमा योजनेत चांदूर बाजार तालुक्यातील गारपीट नुकसानभरपाई पैसे जमा झाले आहेत, तसेच खरीप हंगामात प्राप्त तीन हजार ऑनलाईन अर्जांनुसार रक्कमही प्राप्त आहे. त्याचे वेळेत वितरण व्हावे, असेही निर्देश त्यांनी दिले.
‘पोकरा’त बचत गटांचे जाळे तयार करा
श्री. नवाल पुढे म्हणाले की, नानाजी देशमुख कृषीसंजीवनी योजनेत (पोकरा) महिला बचत गटांचे जाळे होऊन महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी प्रयत्न व्हावे. त्यासाठी महिला बचत गटांच्या माध्यमांतून विविध युनिट सुरु करण्यास प्रोत्साहन द्यावे. छोटे युनिट का असेना, पण प्रत्येक ठिकाणी महिला बचत गटाच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती व आर्थिक सक्षमीकरण होईल, यादृष्टीने सर्वंकष प्रयत्न करावेत.जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी यावेळी यांत्रिकीकरण, कोरडवाहू शेती मिशन, नाबार्ड आदी कामांचाही आढावा घेतला.