औरंगाबाद : खराब ई-तिकीट वेडींग मशीनमुळे माझ्या प्रामाणिक नोकरीवर अप्रामणिकतेचा ठपका लागणार आहे. खराब ई-तिकीट मशीनमुळे झालेल्या तांत्रिक चुकांचा दोष हे माझ्यावर टाकला जाणार आहे. माझ्या आत्महत्येला कुटुंबाचे कोणीही दोषी नाही. खराब ई-तिकीट मशीन देणारे एसटी प्रशासन दोषी असल्याचे चार पानी पत्र लिहून एका कंडक्टरने एसटी बसमध्येच आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. एस. एस. जानकर असे आत्महत्या करणार्या कंडक्टरचे नाव आहे. नांदेड जिल्हय़ातील माहुर आगारातील एका बसमध्ये त्यांनी आत्महत्या केली.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!माहुर आगारात असलेल्या बसची स्वच्छता करण्यासाठी २६ फेब्रुवारी रोजी सकाळी आगारात आलेल्या सफाई कर्मचार्याने जानकर यांनी बसच्या लोखंडी रेलिंगला दोरीच्या साहय़ाने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे पाहिले. त्यांनी ही माहिती आगारातील अन्य कर्मचार्यांना तसेच अधिकार्यांना दिली. या प्रकरणी माहुर पोलिसांना घटनास्थळी बोलावण्यात आले. कंडक्टर जानकर यांना तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. या ठिकाणी जानकर यांना तपासून मृत घोषित करण्यात आले. घटनास्थळाहून एका वहीमध्ये आत्महत्येपूर्वी चार पानी मृत्यूपूर्वीचा जबाब लिहिलेला पोलिसांना आढळून आला. माहुर बस स्थानकाचे आगार प्रमुख व्ही.टी. धुतमल यांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ फेब्रुवारीला पहाटे चार वाजताच्या दरम्यान एस. एस. जानकर यांनी आगारातील एका बसमध्ये गळफास लावून घेतला होता. त्यांच्या जवळील वहीत चार पानांची सुसाईड नोट सापडली आहे. या प्रकरणी माहुर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. एस. एस. जानकर यांच्या मागे पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. जानकर हे नांदेड शहरात सिडको भागात राहात होते, अशी माहिती धुतमल यांनी दिली.
(Image Collection)