• Thu. Sep 28th, 2023

चाचणी कीट व औषधांचा पुरेसा साठा ठेवा – जिल्हाधिकारी

ByGaurav Prakashan

Feb 28, 2021

अमरावती : कोरोना साथीच्या नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाव्दारे विविध उपाययोजना होत असताना बाधितांवर तत्काळ उपचार होण्यासाठी आरटीपीसीआर कीट, रॅपीड अँन्टीजेन कीट व ऑक्सीजन या घटकांचा पुरेसा साठा उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे आहे. याअनुषंगाने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज जिल्हा सामान्य रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट देऊन औषधीसाठा व इतर सुविधांबाबत तपासणी केली.रुग्णांवर तत्काळ उपचार होण्याच्या दृष्टीने औषधांचा पुरेसा साठा ठेवावा, असे निर्देश त्यांनी यंत्रणेला दिले.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, अति. जिल्हा शल्य चिकित्सक सतिश हुमणे यांच्यासह आरोग्य अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता जिल्ह्यात उपलब्ध खाटा, आवश्यक नियोजन व इतर सुविधा आदींबाबत आरोग्य यंत्रणेने सजग राहून कामे करावीत. आयटीआय परिसरात चाचणी केंद्र पुरेशा क्षमतेने कार्यान्वित व्हावे, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्या प्लाज्मादानासाठी पुढे येण्याचे आवाहनही जिल्हाधिका-यांनी यावेळी केले. जिल्ह्यात प्लाज्मादानाबाबत यंत्रणा यापूर्वीच कार्यान्वित करण्यात आलेली आहे. बरे झालेल्या रूग्णांनी प्लाज्मादान करावे. आपल्या या कृतीमुळे एखाद्या रूग्णाचा जीव वाचू शकतो. त्यामुळे बरे झालेल्या रूग्णांनी पुढे येण्याचे त्यांनी केले.एखादा पूर्णपणे बरा झालेला रुग्ण याठिकाणी आपली नोंद करून प्लाज्मा देण्याची इच्छा व्यक्त करून एखाद्या रुग्णाचा जीव वाचवू शकतो, असेही ते म्हणाले.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!