• Mon. Jun 5th, 2023

घर

ByGaurav Prakashan

Feb 2, 2021

एक सोज्वळ नातं. आनंदी परीवार. अशा या आनंदी परीवारात घनश्यामच्या मुलांचा विवाह जुळला. मुलगीही चांगली निघाली. विवाह झाला व मुलगी घरात आली. सर्वांना आनंदी आनंद झाला. सर्वचं आनंदी. त्यातच विवाहीत मुलगा हा नम्र स्वभावाचा असल्यानं मुलीकडील सर्वांना आवडला. मुलांकडील लोकांनाही मुलगी आवडली.घनश्यामचं घर कुडाचं होतं. वर टिनाचं छत होतं. आजूबाजूला ताडपत्री व लाकडी पत्रे लावलेले होते. आतमध्ये वारा शिरजोर बनून शिरत होता. तसेच थंडी, ऊन, वारा, पाऊस सोबतीला असून फेर धरुन नाचत होते. त्यातच घरात कधीकधी साप व विंचवासारखे प्राणीही निघत. तरीही तो परिवार आनंदी होता. कारण ते घर कधीमधी त्यांच्या परीवाराशी बोलत होतं. हे बोलके ऋणानुबंध कित्येक पिढ्यांपासून घनश्यामच्या घराशी जुळले होते. आज तेच घर जरी झोपडं होतं, तरी खुश होतं. या टिनटपरीच्या झोपड्यानं घनश्यामच्या कित्येक पिढ्या सांभाळल्या होत्या.घनश्यामच्या मुलाचा विवाह थाटात पार पडला. नवीन घरात आलेली पारु सुशील असून सुशिक्षीत होती. तसा माधवही शिकलेलाच होता. तसाच त्याचा स्वभाव चांगला असल्यानं घराकडं न पाहता पारुच्या आईवडीलांनी पारुचं नातं पक्क केलं. नवीन घरात आलेली सुन. ती सुशिक्षीत होती. तिचं मित्रमंडळही सुशिक्षीत होतं. कधीमधी तिचे मित्रमंडळ घरी येत. तिचं घर पाहून ते काहीबाही बोलत नव्हे तर नातेवाईकही येत. तेही काहीबाही बोलत असत. याच बोलण्यातून हळूहळू पारुच्या मनाची कालवाकालव होवू लागली. तिला वाईट वाटायला लागलं. तिचं मन बदलायला लागलं. त्यामुळं की काय ती आपल्या पतीसोबत भांडायलाही लागली.पतीच तो……..तो त्यावर दुर्लक्ष करु लागला. पण दुर्लक्ष तरी किती करणार! शेवटी ते भांडण परीवारात होवू लागलं. अशातच एक दिवस कोण्या नातेवाईकाच्या भडकवण्यावरुन पारु घर बांधल्याशिवाय मला न्यायला येवू नका असं निमित्य करुन माहेरी चालली गेली.
पारुचा पती माधव कासावीस होत होता. त्याला आता पत्नीशिवाय करमत नव्हतं. काय करावं ते कळेनासं होतं. पत्नी घर बांघल्याशिवाय येत नाही असं म्हणत होती. शेवटी उपाय नव्हता. तसा तो विचार करीत होता की आपण पत्नीला सोडून द्यावं. परंतू तो पत्नीला सोडूही शकत नव्हता. कारण त्याला एक गोंडस मुलगी होती. तो विचार करीत होता. तशी त्याला एक नामी युक्ती सापडली. आपण कर्ज उचलावं. माधवनं भरायची ऐपत नसतांनाही कर्ज उचललं. त्या घराच्या बांधकामासाठी जुन्या घराच्या भींती तोडल्या. त्याचबरोबर त्या जुन्या घराचं माधवशी असलेलं नातं तुटलं. ते घर नाराज झालं. कारण माधवच्या ब-याचशा पीढीनं त्याच घरात अगदी आनंदानं निवास केला होता. ते घर……..ज्या घरात आनंदीआनंद असल्यानं डोलत होतं. त्याच घराच्या भींती तुटताच अख्खा आनंद पार कोलमडला.
घराचं बांधकाम पुर्ण झालं. माधवची पत्नीही राहायला आली. तिही अगदी गुण्यागोविंदानं राहात होती. दोघांचंही चांगलं पटत होतं. पण जुन्या घराचा शाप बसला की काय, आता पतीपत्नींचं कितीही पटत असलं तरी त्या नव्या घरात पाहिजे तो आनंद मिळत नव्हता. माधवचे कामधंदे व्यवस्थीत चालत नव्हते. कारण कोरोना आला होता. काय करावं ते सुचेनासं होतं. अशातच बँकेच्या किस्ता थकत चालल्या होत्या.बँकेच्या किस्ता जसजशा थकत होत्या. त्या भरण्यासाठी माधवनं मित्रमंडळींकडून व्याजाऊ रक्कम उचलली. पण कामधंदे व्यवस्थीत नसल्यानं शेवटी पोट कसं भरावं म्हणून माधव येणारा पैसा कुटूंबासाठीच खर्च करीत होता. अशातच आता बँकेच्या किस्तीसोबतच आता मित्रमंडळींच्याही पैशांची चिंता. चिंता वाढत चालली होती. घर जागच्या जाग्यावर होतं. लहान घराऐवजी मोठं घर बनलं होतं. पण अंगावरील मळ झटकतांना तेच घर आज रुसलं होतं. नव्हे तर या मित्रमंडळींच्या पैशाच्या तकाद्यानं माधव पिसाळला होता. त्याचबरोबर त्याची पत्नीही. ती तर म्हणत असे की जर मी हे घर आधीच पाहिलं असतं तर तुमच्याशी विवाहच केला नसता. चूक तिचीच होती. पण ती चूक त्याच्यावरच ढकलत होती. त्या चुकीचं खापर त्याच्यावरच फोडत होती. अशातच त्यानं शेवटी विचार केला. आपण आत्महत्या करावी.आत्महत्या करण्याचा त्याचा विचार. त्यानं आपल्या पत्नीला बोलून दाखवला नाही. अशीच एक सायंकाळ……त्या सायंकाळी त्यानं आपल्या गाडीवर आपल्या पत्नीला फिरायला नेलं. तशी ती नदी लागली. आजूबाजूला कोणीही नव्हतं. तसे ते नदीच्या मधोमध गेले.
सेल्फीचा काळ. माधवनं गाडी कडेला लावली. तसा तो पत्नीला म्हणाला,”आपण सेल्फी काढूया का?” पत्नीनं नाही म्हणता म्हणता होकार दिला. तसे ते नदीच्या मधोमध त्या पुलाच्या किना-यावर उभे राहिले. ते सेल्फी काढतच होते. तोच माधव कसल्यातरी बहाण्यानं खाली वाकला. तो फक्त खालीच वाकला नाही तर पलक झपकते न झपकते त्यानं मनात आखलेल्या योजनेनुसारच आपल्या पत्नीचे पाय धरले व तिला त्या नदीच्या तीव्र प्रवाहात फेकून दिले. त्यानंतर त्यानं लहानग्या त्या मुलीलाही जबरदस्तीनं उचललं व ती रडत असतांना तिलाही नदीत फेकलं व स्वतःही त्यानं नदीत उडी मारुन आत्महत्या केली.सायंकाळ झाली होती. कोणाला यत्किंचीतही कल्पना नव्हती. बाप घनश्यामला वाटलं की माधव कोण्या नातेवाईकाच्या घरी मुक्कामाला असेल. त्यांनीही चिंता सोडून दिली. ती नदी……..पारुला पोहता येत नसल्यानं ती गटांगळ्या खात खात मरण पावली. त्याचबरोबर तिची मुलगीही मरण पावली. तसे दोन दिवस झाले होते. दोन दिवसानं ती त्यांची प्रेतं अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत बाजूच्या गावाला दिसली. कुणीतरी ते प्रेतं दिसताच पोलिसस्टेशनला फोन लावला. तपासचक्र जोरात फिरवली गेली व माहिती पडलं की ती प्रेतं माधव व पारुची असून ती पारु घनश्यामची स्नुषा आहे. कारणाचा पदडा मात्र उघड झाला नाही. पोलिसांनी त्यांच्या मृत्यूची नोंद आत्महत्या म्हणून दाखल केली. गुन्हा कोणावरच नोंदवला नाही.
माधव व पारु मरण पावले. ते तिन्ही प्रेतं त्या घरानं अनुभवले. जे घर आज जागच्या जाग्यावर होतं. नव्हे तर तेच घर त्या घरातील त्या तिन्ही लाशा पाहून हसत होतं. घनश्यामच्या तोंडचं सुख गळालं होतं. कारण त्यानं आपल्या स्वतःच्या डोळ्यानं आपला हसता खेळता परीवार संपतांना पाहिला होता. ते स्वप्न पाहिले होते. ते स्वप्न आज या नव्या घरानं कायमचे संपवले होते. आपल्या आनंदासाठीच त्या घरानं घनश्यामचेही आनंदाचे दिवस हिरावले होते. त्यांच्या डोळ्यात अश्रूंच्या आठवणी तेवत ठेवून. नव्हे तर इतरांना कर्ज काढून घर बांधू नका हा संदेश देण्यासाठी.
आज लोकं मुलगी बघायला जातात. पसंतही करतात. पण मुलींच्या इच्छा विचारत नाही वा विचारात घेत नाहीत. आईवडील म्हणतात, मुलीची काय इच्छा. आम्ही म्हणू ते. ते तिला विवाहापुर्वी घर दाखवत नाहीत. पण त्यांच्याही काही इच्छा असतात. त्या इच्छा नकळत आपल्या आईवडीलांसमोर मुली लपवून ठेवतात. आपल्या आईवडीलांचा मान राखावा म्हणून. पण आईवडील काय करतात. ते तर आपल्या इच्छा त्यांच्यावर लादून त्यांचा जीवच घेत असतात. ही विचार करायला लावणारी बाब आहे. पारु आणि माधवच्याही बाबतीत हेच झालं. पारुला विवाहापुर्वी पतीचं घर पाहता न आल्यानं तिच्या भविष्यात असा अंधार पडला. जर तिला घर पाहू दिलं असतं, तिची इच्छा विचारली असती तर, तर काहीतरी चित्र निराळे असते.पण तिची इच्छा न विचारल्यानं जो प्रकार घडला. तो प्रकार समाजजाणीवा देणारा आहे. ते घर आज डौलानं उभं होतं. त्या घराच्या भींती मजबूत होत्या. आता घरात माणूसच का, ऊन,वारा,पाऊस थंडी यापैकी कोणीही येत नव्हतं. शिवाय घनश्यामविणा. घनश्यामही कधी कधी उदास होवून हेच स्वप्न पाहात होता. त्याला आत्महत्या करावीशी वाटत होती. कारण त्याला त्याच्या डोळ्यात त्याचं ते घर दिसत होतं. जे आजही त्याला जीवाभावाचं वाटत नव्हतं. खायला धावत होतं. पण त्याची पत्नी चांगली होती. जी तो उदास असतांना पाठीमागून येवून खांद्यावर हात ठेवायची आणि म्हणायची. ” आता सगळं विसरा.” तसे तिच्याही डोळ्यातून आसवं बाहेर पडायचे आणि तिही तळमळायची.

    अंकुश शिंगाडे
    नागपूर
    ९३७३३५९४५०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *