नवी दिल्ली : करोनाच्या नव्या स्ट्रेनने चिंता वाढवली आहे. कोरोनाच्या या नव्या स्ट्रेनमुळे देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याची शक्यता आहे. मागच्या काही दिवसांपासून देशात कोरोना व्हायरसचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान कार्यालयात बैठक झाली. या बैठकीला आरोग्य सचिव राजेश भूषणही उपस्थित होते.
महाराष्ट्रात कोरोना रुग्ण वाढीमागे कोरोनाचा नवा स्ट्रेन असू शकतो, असे डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले होते. ते महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे सदस्य आहेत. काही राज्यांमध्ये कोरोना रुग्ण संख्या वाढली आहे. काही ठिकाणी नवीन स्ट्रेन आढळून आले आहेत. व्हायरसमध्ये म्युटेशन म्हणजे परिवर्तन होत असते, त्यातून नव्या स्ट्रेनची निर्मिती होते.
व्हायरसच्या जनुकीय रचनेसंदर्भात चाचणीसाठी महाराष्ट्र आणि केरळमधून ८00 ते ९00 नमुने पाठवण्यात आले आहेत, असे आरोग्य मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले. महाराष्ट्राशिवाय केरळ, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि पंजाबमध्येही कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढले आहे.
भारतात यूके स्ट्रेनचे २00 पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत. दक्षिण आफ्रिकेतील स्ट्रेन चौघांमध्ये तर ब्राझीलचा स्ट्रेन एका व्यक्तीमध्ये आढळला. ही नवीन रुग्णवाढ कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळेच झालीय, हे खात्रीलायकपणे सांगता येणार नाही. त्यासाठी संशोधन सुरु आहे. महाराष्ट्रात अमरावती, यवतमाळमध्ये पुन्हा निबर्ंध लागू झाले आहेत. मुंबईत नागरिकांनी कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी नियमांचे पालन केले नाही, तर लॉकडाउन लावण्याचा इशारा देण्यात आला आहे.