• Sat. Jun 3rd, 2023

कुठे शोधू मी तुला

ByGaurav Prakashan

Feb 1, 2021
  रणरणत्या ऊन्हातून
  न्हाऊन निघालेल्या
  अलवार रात्रीत…की..,
  धुक्याने आच्छादलेल्या
  ब्रम्हमुहूर्ताच्या
  त्या रम्य पहाटेत…!
  कुठे शोधू मी तुला…
  जगाला जीवंत असल्याची
  साक्ष देणाऱ्या सूर्याच्या
  कोवळ्या किरणांत…की..,
  अस्थिर असूनही स्थिर
  भासणाऱ्या त्या
  मोहक सांजवेळेत…!
  कुठे शोधू मी तुला…
  पावसाच्या पहिल्या
  चमकदार थेंबात…की..,
  प्राजक्ताच्या केशरी
  देठावर विसावलेल्या
  त्या नितळ दवबिंदूंत…!
  कुठे शोधू मी तुला…
  छोट्या पाखराला
  आपल्या चोचीतून चारा
  भरवणाऱ्या आईत…की..,
  पाखराच्या पंखांत बळ
  देऊन गगनात झेप घ्यायला
  लावणाऱ्या त्या बापात…!
  कुठे शोधू मी तुला…
  आईच्या कुशीत निवांत
  निजलेल्या बाळाच्या
  अलगद हसूत…की..,
  सांजवेळेची काठी
  हाती धरलेल्या त्या
  सुरकुतलेल्या डोळ्यांत…!
  कुठे शोधू मी तुला…
  काटे असूनही
  मनाला भुलावणाऱ्या
  नाजूक डेरेदार गुलाबात…की..,
  जगाला अनोळखी असणाऱ्या
  दूर एकांतात वाढणाऱ्या
  त्या रानफुलांत…!
  कुठे शोधू मी तुला…
  कृष्णाच्या बासरीतून
  निघालेल्या सुमधूर सुरांत…की..,
  संतापलेल्या त्रिनेत्री
  महादेवाच्या तांडवांत…!
  कुठे शोधू मी तुला…
  मंदिरात सजविलेल्या
  काळ्या पाषाणमूर्तीत…की..,
  अंतरी खोलवर वसलेल्या
  त्या मनाच्या गाभाऱ्यात…!
  कुठे शोधू मी तुला…
  तुच सांग ना…
  कुठे शोधू मी तुला…!!!
  -सौ.कोमल तुषार शिंदे,
  धुळे.
  7447583255

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *