किरण बेदी या भारतातील पहिल्या आयपीएस (अखिल भारतीय इंडियन पोलिस सर्व्हिससाठीच्या परीक्षेतून आलेल्या) अधिकारी आहेत. मसुरी येथील राष्ट्रीय अकादमीमध्ये पोलिस ट्रेनिंगमध्ये ८0 पुरुष तुकडीतील त्या एकमेव महिला होत्या. २0११ च्या भारतीय भ्रष्टाचारविरोधी चळवळीच्या प्रमुख नेत्यांपैकी त्या एक होत्या आणि जानेवारी २0१५ मध्ये त्या भारतीय जनता पक्षात सामील झाल्या. २0१५च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत त्यांनी पक्षाच्या मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून असफल निवडणूक लढविली. २२ मे २0१६ रोजी बेदी यांना पाँडिचेरीच्या लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून नेमण्यात आले होते. मात्र, नुकतीच त्यांची या पदावरून गच्छंती करण्यात आल्याने त्या चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. पुडुचेरीच्या नायब राज्यपालपदी असताना किरण बेदी यांना यापूर्वी मद्रास उच्च न्यायालयाने दणका दिला होता. पुडुचेरी सरकारच्या दैनंदिन कामकाजामध्ये बेदी यांना हस्तक्षेप करता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. नायब राज्यपाल म्हणून केंद्र सरकारने बेदी यांना काही विशेष अधिकार दिले होते ते अधिकार मे २0१९ मध्ये न्यायालयाने काढून घेतले होते. या अधिकारांमुळे बेदी पुडुचेरी सरकारच्या दैनंदिन कामकाजात लक्ष घालत होत्या. सरकारने घेतलेल्या कोणत्याही निर्णयाची फाईल तपासण्यासाठी मागविण्याचा अधिकार त्यांना मिळाला होता. त्यामुळे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी आणि बेदी यांच्यात खटके उडत होते. पुडुचेरीतील काँग्रेसचे आमदार के. लक्ष्मीनारायणन यांनी बेदी यांच्या विशेष अधिकारांना न्यायालयात आव्हान दिले होते. सरकारकडून कोणतीही फाईल मागविता येणार नाही अथवा सरकारला किंवा सरकारच्या वतीने कोणताही आदेश देता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्यावेळीसुद्धा बेदी देशभरात चर्चेचा विषय ठरल्या होत्या. नुकतेच पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांना पदावरून हटविण्यात आले आहे. मागील काही काळापासून बेदी आणि काँग्रेसचे मुख्यमंत्री नारायणसामी यांच्यामध्ये सुरू असणार्या वादाच्या पार्श्वभूमीवर बेदी यांना हटविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बेदी यांच्या जागी तेलंगणाचे राज्यपाल तमिलसाई सुंदरराजन यांच्याकडे पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल पदाचा अतिरिक्त कारभार सोपविला आहे. काही दिवसांपूर्वीच म्हणजेच १0 फेब्रुवारीला राज्याचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी राष्ट्रपतींना बेदी यांच्यासंदर्भात पत्र पाठविले होते. त्या पत्राद्वारे बेदी यांना परत बोलवून घ्यावे, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली होती. किरण बेदींचा कारभार तुघलकी असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला होता. बेदी यांना पदावरून हटविण्याआधीच पुदुच्चेरीमधील काँग्रेसचे सरकार अल्पमतात आल्याने बेदींना हटविण्यामागील नक्की कारण काय असावे यासंदर्भात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
- प्रमोद बायस्कर