• Mon. Sep 25th, 2023

कठोर निर्णय घेण्याची वेळ येऊ देऊ नका-अजित पवार

ByGaurav Prakashan

Feb 23, 2021

मुंबई : कोरोना पाठोपाठ राज्यावर लॉकडाऊनचे ढग गडद होताना दिसत आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये निर्बंध घालण्यात आल्याने लॉकडाउन सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, पुढील आठ दिवसात रुग्णसंख्या आणि कोरोना वाढला तर लॉकडाउनचा निर्णय घेण्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही संकेत दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या इशार्‍यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महाराष्ट्रातील नागरिकांना, कृपा करा, कठोर निर्णय घेण्याची वेळ येऊ देऊ नका, असे कळकळीचे आवाहन केले आहे.
न्हावा शेवा टप्पा-३ योजनेचे भूमिपूजन समारंभात बोलताना अजित पवार यांनी वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येबद्दल चिंता व्यक्त केली. अजित पवार म्हणाले, राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढायला लागला आहे. दररोज रुग्णांची वाढतेय. सावध राहायला हवं. मास्क वापरायला हवा. शहरात लॉकडाउनची वेळ येणार नाही, याची काळजी घेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. यवतमाळ, अमरावती, अकोला या जिल्हय़ांमध्ये काही कठोर निर्णय घ्यावे लागले. पुण्यातही थोडी कडक भूमिका घ्यावी लागली. प्रशासन व राजकीय प्रतिनिधींशी चर्चा करून रात्रीच्या वेळी कडक भूमिका घेण्यात आली आहे, असे अजित पवार म्हणाले.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

आताच कोरोना तर पूर्ण कुटुंबालाच वेढून टाकतोय. मी हेलिकॉप्टरमध्ये मुख्यमंत्र्यांनी बोलत होतो. आमचे काही सहकारी अनिल देशमुख, जयंत पाटील, सतेज पाटील, छगन भुजबळ, डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यासह अनेक मंत्र्यांना कोरोना झाला आहे. संख्या वाढत चालली आहे. एकदा लॉकडाउन केल्यानंतर संपूर्ण अर्थव्यवस्थेची घडी विस्कटून जातेय, हे आपण पाहिले आहे. दिवसभर काम केल्यानंतर ज्यांची संध्याकाळी चूल पेटते, त्यांची तर एवढी बिकट अवस्था होतेय. कसं जगायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण होतो. लोकांचे कोरोनाबद्दलचे गांर्भीय निघून गेले आहे. कृपा करा, कठोर निर्णय घेण्याची वेळ राज्य सरकारवर येऊ देऊ नका, हेच मला महाराष्ट्रातील जनतेला सांगायचे आहे, असा निर्वाणीचा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.