अमरावती, दि. 25 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोविड तसेच नॉन कोविड रुग्णांवर खासगी रुग्णालयांमध्ये करण्यात येणाऱ्या विविध उपचारांचे व चाचण्यांचे दर सार्वजनिक आरोग्य विभागाव्दारे निर्धारित करण्यात आले आहेत. त्यानुसार रुग्णालयांनी तसेच तपासणी केंद्रानी शासनाने निश्चित केलेल्या दराप्रमाणेच रुग्णांकडून उपचाराकरीता व चाचण्यांकरीता आकारणी करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!या उपचार, चाचण्या व तपासण्यांसाठी जादा दर घेणाऱ्या रुग्णालयांवर आता दंडात्मक कार्यवाहीसह फौजदारी गुन्हा दाखल करुन रुग्णालय किंवा तपासणी केंद्र सील बंद करण्याची कार्यवाही केल्या जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
कोरोनाबाधित रूग्णाला विविध प्रकारच्या तपासण्याव्यतिरिक्त सी. टी. स्कॅनसारख्या तपासण्यांची आवश्यकता भासत असल्याने कोविड व नॉनकोविड रूग्णांसाठी एचआरसीटी चाचणीचे दर निश्चित करण्यात आले आहेत. मशिनच्या क्षमता वैशिष्ट्यानुसार ही दर आकारणी निश्चित करण्यात आली आहे. एचआरसीटी-चेस्ट तपासणीसाठी 16 स्लाईसच्या मशिनसाठी दोन हजार रूपये, मल्टि डिटेक्टर सीटी (एम डी सीटी) 16 ते 64 स्लाईसच्या मशिनसाठी अडीच हजार रूपये, 64 स्लाईसहून अधिकच्या मशिनसाठी तीन हजार रूपये दर निश्चित केले आहेत. या रकमेत सीटी स्कॅन तपासणी, तपासणी अहवाल सिटी फिल्म, पीपीई कीट, डिसइन्फेक्टेड, सॅनिटायझेशन चार्जेस व जीएसटी यांचा समावेश आहे. एचआरसीटी चेस्ट नियमित व तातडीच्या तपासणीसाठी हे समान दर लागू राहतील. या आदेशापूर्वी जर एखाद्या तपासणी केंद्राचे दर कमी असतील, तर ते कमी दर लागू राहतील.
परोक्तप्रमाणे चाचण्यांच्या कमाल रकमेत सी. टी. स्कॅन तपासणी, तपासणी अहवाल, सी.टी. फिल्म, पीपीई किट, डिसइन्फेक्टंट, सॅनिटायझेशन चार्जेस व जी. एस.टी. या सर्वांचा समावेश राहील. एचआरसीटी चेस्ट नियमित व तातडीच्या तपासणीसाठी उपरोक्त समान दर लागू राहतील.
एचआरसीटी- चेस्ट तपासणी केल्यानंतर अहवालावर कोणत्या सिटी मशिनद्वारे तपासणी केली ते नमूद करणे बंधनकारक आहे. कोणत्याही डॉक्टरच्या प्रिस्किप्शनशिवाय ही तपासणी करू नये. तपासणी करणा-या रेडिओलॉजिस्टने संपूर्ण तपासणी अहवाल देणे बंधनकारक आहे. ज्या रूग्णाकडे आरोग्य विमा योजना आहे किंवा एखाद्या रूग्णालयाने किंवा खासगी आस्थापनेने तपासणी केंद्राशी सामंजस्य करार केलेला असेल तर हे दर लागू राहणार नाहीत.रूग्णालये किंवा तपासणी केंद्रांनी एचआरसीटी- चेस्ट तपासणीसाठी निश्चित केलेले दर दर्शनी भागात लावणे, तसेच निश्चित दरानुसार दर आकारणी करण्याबाबत हॉस्पिटल व्यवस्थापनाला सूचना देणे बंधनकारक राहील.