आयुर्मान संपलेली मराठवाड्यातील 93 हजार वाहने स्क्रॅप करण्याची गरज

औरंगाबाद : केंद्राने नवीन वाहन स्क्रॅप धोरण आणले असून आता १५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक जुने वाहन बाळगणे महागात पडणार आहे. नव्या धोरणानुसार मराठवाड्यात ९३ हजार २५ वाहनांचे आयुर्मान संपले असून राज्यात मात्र या वाहनांची संख्या १० लाख २९ हजार ९७९ इतकी आहे. विशेष म्हणजे, राज्य परिवहन विभागाने २००५-०६ मध्ये नोंदणी झालेल्या वाहनांची नोंद घेतली असून ही वाहने स्क्रॅप करण्यासाठी वाहन मालकांनी समोर येणे गरजेचे आहे.
वाहनांपासून होणाऱ्या प्रदूषणावर आळा घालणे, रस्ते अपघात कमी करणे, परिवहन उद्योग, व्यवसाय विकास, बेरोजगारांच्या हाताला काम यासह विविध उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून केंद्र सरकाराच्या वतीने अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात १५ वर्षांच्या पुढील जुनी वाहने नष्ट करण्यासाठी “व्हेइकल स्क्रॅप’ धोरण जाहीर केले आहे. जुने वाहन स्क्रॅप केल्यावर नव्या वाहनाचे नोंदणी शुल्क माफ करण्याचा सरकारचा विचार आहे. एवढेच नव्हे तर स्क्रॅप करताना जुन्या वाहनाच्या किमतीचे मूल्यांकन करून तेवढीच सूट नव्या वाहनाच्या किमतीवर देण्याचा विचार होत आहे. यासह विविध सवलती दिल्या जाणार आहेत. यासाठी जुन्या वाहनांचे स्क्रॅपेज प्रमाणपत्र घेणे अनिवार्य केले आहे. त्याचा महाराष्ट्र, मराठवाड्यातील किती वाहनधारकांना लाभ घेता येईल? राज्यात १५ वर्षे पूर्ण झालेली १०.२९ लाखांवर विविध वाहने आहेत. त्यात सर्वाधिक दुचाकी, कार, जीप आदी २१ प्रकारच्या वाहनांचा समावेश आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!