• Thu. Sep 28th, 2023

अमोल मिटकरींचे गोपीचंद पडळकरांना प्रत्युत्तर

ByGaurav Prakashan

Feb 19, 2021

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात गेल्या काही दिवसांपासून खडाजंगी सुरू आहे. जेजूरीत काही दिवसांपूर्वी पुण्योक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणावरून पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अमोल मिटकरी यांच्यावर टीका केली होती. त्यावर आता अमोल मिटकरी यांनी पडळकरांना नाव न घेता सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे.
तू बोलतो किती? तुझी औकात किती? तू आहेस केवढा? माझ्यासवे लढाया वाघास बोलवावे, कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही, अशा खरमरीत शब्दांमध्ये अमोल मिटकरी यांनी पडळकर यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. शिवचरित्र सांगून लाख-लाख रुपये कमावणारा बाजारू, अशा शब्दांत पडळकर यांनी मिटकरींना लक्ष्य केले होते. त्यावर प्रत्युत्तर देताना, मी शिवचरित्र सांगितले. फाट्यावर दारू तर विकली नाही ना. एखाद्या वृद्ध महिलेची २ कोटींची जमीन ५ लाखात तर हडप केली नाही ना?, असा सवाल मिटकरींनी विचारला. तसेच, मी बोलायला लागलो तर संपूर्ण कुंडली तयार आहे. पण वेट अँड वॉच. समय जरुर आयेगा. ज्या दिवशी बोलेन, त्या दिवशी पळता भुई थोडी होईल, असे म्हणत मिटकरींनी पडळकरांना अप्रत्यक्ष इशारा दिला. यावेळी समोर कॅमेरा असल्याने मी नाव न घेता बोलणार आहे, असेही मिटकरी म्हणाले.
भुंकणार्‍या कुत्र्याकडे बैल एकदा, दोनदा किंवा तिनदा दुर्लक्ष करतो. पण चौथ्यांदा मात्र लाथ घालतो. मला आमदारकी देणारे आमचे गुरु सांगतात की विरोधासाठी विरोध करायचा नाही. शांत बसायचे. पण टप्प्यात आला की करेक्ट कार्यक्रम करायचा, असे मिटकरी म्हणाले. काही जण म्हणतात, मिटकरी फक्त भाषणं करतात. ते बाजारू आहेत. त्यांना म्हणावे आज खरी भाषणं देतोय म्हणून आमदार झालोय. खोटी भाषणे दिल्यास पंतप्रधानदेखील होता येते, अशा शब्दांत मिटकरींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्ष टीका केली.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!