हिंगणघाट : प्रा. अंकिता पिसुड्डे जळीतकांड प्रकरणात बुधवारी दोन डॉक्टर, अंकिताच्या दोन विद्यार्थिनी आणि कबुली जबाबमधील एक पंच अशा पाच साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे आतापयर्ंत एकूण १६ साक्षीदार नोंदविण्यात आलेले आहे.
या साक्षनोंदीत पंच साक्षीदाराची अपूर्ण राहिलेली साक्ष उलट तपासासाठी येत्या २0 मार्चला होणार आहे. अंकिता पिसुड्डे जळीतकांड प्रकरणाचे कामकाज बुधवारी सकाळी ११ वाजता जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर.एन. माजगावकर यांच्यासमोर सुरू झाले. कामकाजाच्या सुरुवातीत मृतक अंकिताच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करणारे नागपूर मेडिकल कॉलेजचे तीन डॉक्टरपैकी डॉ. ऋषिकेश पाठक यांची साक्ष झाली. त्यांनी सरतपासात पीडिता ३५ टक्के जळालेली होती. जळाल्याच्या जखमा तिला झालेला होत्या. तिला श्वास घेणे कठीण झालेले होते. यातून तिचा मृत्यू झाला, अशी साक्ष नोंदविली. यावर आरोपीच्या वकिलांनी त्यांना उलटतपासात तिचे शवविच्छेदन तीन डॉक्टरांनी का केले, असा प्रतिप्रश्न केला. पोलिस तपास अधिकार्यांनी हेड ऑफिसला पत्र दिल्याने तीन डॉक्टरांच्या टीमने शविच्छेदन केल्याचे डॉ.पाठक यांनी कोर्टासमोर सांगितले. दुसरी साक्ष स्थानिक उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. सौरभ धोपटे यांची झाली. डॉ. धोपटे यांनी घटनेनंतर तिला उपजिल्हा रुग्णालयात आणल्यावर प्रथम उपचार केले होते. त्यांनी साक्ष नोंदाविताना सांगितले की, अंकिताला रुग्णालयात आणले तेव्हा ती शुद्धीवर होती. तिने स्वत:चे नाव सांगितले. तिने आरोपी व नंदोरी रोडचा उल्लेखही केला. तिची प्रकृती सिरियस होती, असे कथन केले. त्यानंतर मृतक अंकिता ही दारोडा या तिच्या गावावरून ज्या विद्यार्थिनीसोबत कॉलेजला नेहमी यायची तिची साक्ष नोंदविण्यात आली. आरोपी तिचा पाठलाग करायचा, दारोडा बसस्थानकजवळ तो गाडीवर स्टंट करायचा, आरोपीच्या कृत्यामुळे अंकिता घाबरलेली होती, अशी साक्ष नोंदविली. त्यानंतर प्रत्यक्षदश्री अजून एका विद्यार्थिनीची साक्ष झाली. ही साक्षही महत्त्वपूर्ण होती. यानंतर आरोपीला अटक केल्यांनतर समुद्रपूर पोलिसात आरोपीने दिलेल्या कबुली जबाबानुसार आरोपीने झुडपात लपविलेले कपडे, लाईटर, बॉटल, पेट्रोल आणि लाल रंगाचा शर्ट पोलिसांनी हस्तगत केले होते. यावेळी पंच योगेंद्र जगनाळे यांच्यासमोर घटनास्थळावरून हे साहित्य हस्तगत करण्यात आले होते. त्यांची साक्ष आज झाली पण, उलटतपास आज पूर्ण होऊ शकला नाही. उलट तपासासाठी आरोपीच्या वकिलांनी वेळ मागितल्याने २0 मार्च ही तारीख उलट तपासासाठी ठेवण्यात आली, अशी माहिती प्रसिद्ध विशेष सरकारी वकील अँड. उज्ज्वल निकम यांनी दिली. या प्रकरणात आणखी सात ते आठ जणांच्या साक्ष होणे बाकी असल्याचेही ते म्हणाले.
सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी भाग घेतला. त्यांना सरकारी वकील अँड. दीपक वैद्य यांनी सहकार्य केले तर बचाव पक्षातर्फे भूपेंद्र सोने यांनी भाग घेतला. कामकाजादरम्यान या प्रकरणाच्या तपास अधिकारी पोलिस उपविभागीय अधिकारी तृप्ती जाधव या उपस्थित होत्या. न्यायालयीन परिसरात आरोपी विक्कीच्या पत्नीसह कुटुंबीयही उपस्थित होते. या खटल्यादरम्यान पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता.
अंकिता जळीत प्रकरणात पाचजणांची साक्ष नोंदविली
Contents hide