• Thu. Sep 28th, 2023

अँसिडिटीकडे दुर्लक्ष पडेल महागात..!

ByGaurav Prakashan

Feb 17, 2021

    अँसिडिटी म्हणजे आम्लपित्त. अँसिडिटी ही सर्वसामान्य समस्या मानली जाते. बहुसंख्य लोकांना कधी ना कधी अँसिडिटी होते. वारंवार होणार्‍या अँसिडिटीच्या समस्येकडे दुर्लक्ष करणं चांगलंच महागात पडू शकतं. कारण अशा लोकांना भविष्यात पोटाचे विकार त्रास देऊ शकतात. पोटाचा अल्सर तसंच आतड्यांमध्ये छाले पडण्यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. अँसिडिटीची कारणं, लक्षणं आणि उपचार याबाबत जाणून घेऊ.

    Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    अँसिडिटीला वैद्यकीय भाषेत ‘गॅस्ट्रो इसोफेजिअल रिफ्लक्स डिसिज’ असं म्हटलं जातं. अँसिडिटीमुळे पोटाच्या वरच्या भागात वेदना आणि जळजळ जाणवू शकते. भूक मंदावणं, आंबट ढेकर, गॅस ही अँसिडिटीची लक्षणं असू शकतात. गॅस्ट्रिक ग्रंथींच्या माध्यमातून पोटामध्ये आम्लांची निर्मिती होत असते. दर दोन तासांनी पोटात आम्लं तयार होत असतात. या आम्लांमुळे अन्नपचनाच्या क्रियेला गती मिळते. इतकंच नाही तर ही आम्ल अन्न तसंच पाण्याच्या माध्यमातून पोटात गेलेल्या घातक जंतूंना नष्ट करण्याचं काम करतात. तसंच गुंतागुंतीच्या प्रथिनांचं विघटनही याच आम्लांमुळे शक्य होतं. मात्र या आम्लांचं प्रमाण वाढल्यास छातीत जळजळ, वेदना जाणवू लागतात. पोटातील आम्ल अन्ननलकेत पोहोचल्यास त्रास वाढू शकतो. याला अँसिड रिफ्लेक्स असं म्हटलं जातं. अशा स्थितीत आंबट ढेकरा येऊ लागतात.

    वारंवार उद्भवणारी डोकेदुखी किंवा मायग्रेन हे सुद्धा अँसिडिटीचं लक्षण असू शकतं. चहा-कॉफीसारख्या कॅफेनयुकत पदार्थांचं अधिक प्रमाणात सेवन, जागरण, सकाळी उशीरापर्यंत झोपून राहणं, पोटाला तड लागेपर्यंत खाणं, जेवताना दुसरीकडे लक्ष केंद्रित असणं, बकाबक खाणं, गरजेपेक्षा जास्त पाणी पिणं, धूम्रपान, मद्यपान, ताणतणाव ही अँसिडिटीची कारणं आहेत. अँसिडिटीवर अँटासिड औषधं किंवा सीरप घेतली जातं. मात्र यामुळे शरीरात लोह, मॅग्नेशियम तसंच अन्य खनिजांचं प्रमाण कमी होऊ लागतं. अँटासिड हा अँसिडिटीवरचा कायमस्वरुपी उपाय ठरू शकत नाही. या औषधाचं सेवन न केल्यास हा त्रास वारंवार उद्भवू शकतो. अँसिडिटीमुळे गॅस्ट्रायसिस, बद्धकोष्ठता, छातीत जळजळ, अँनिमिया, केस गळणं, वजन वाढणं किंवा कमी होणं, निद्रानाश, झोपेत अडथळे येणं, नखं तुटणं, डोकेदुखी, आतड्यांचा अल्सर, त्वचा कोरडी होऊन त्यावर चट्टे पडणं असे त्रास होऊ शकतात. म्हणूनच या व्याधीवर वेळीच उपचार व्हायला हवेत.

    अँसिडिटीवर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेता येतील. त्याशिवाय पोषक आहार, पुरेशी झोप, नियमित व्यायाम, फळं आणि भाज्यांचं सेवन, रात्री हलका आहार घेणं, पुरेसं पाणी पिणं, तेलकट, मसालेदार पदार्थ वज्र्य करणं, ताणतणावांवर नियंत्रण मिळवणं, मद्यापान, धूम्रपानाचं प्रमाण कमी करणं असे उपाय करता येतील.