• Mon. Jun 5th, 2023

MPSC परीक्षा:वर्षभरापासून लांबणीवर असलेल्या राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा मार्चमध्ये.!

ByBlog

Jan 9, 2021

मुंबई : गेल्या वर्षभरापासून लांबणीवर असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या (MPSC) नव्या तारखा समोर आल्या आहेत. त्यानुसार, मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्य लोक सेवा पूर्व परीक्षा तर तिसऱ्या आठवड्यामध्ये अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा घेतल्या जातील. दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा एप्रिल महिन्यात होणार असल्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आज यासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून औपचारिक घोषणा केली जाऊ शकते.

कोरोना आणि लॉकडाउनमुळे राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा गेल्या वर्षभरापासून रखडल्या होत्या. त्यामुळे, अनेक वर्षांपासून या परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी तारखांची प्रतीक्षा होती. राज्यात आणि देशात अनलॉक झाल्यानंतर उमेदवारांची परीक्षेच्या तारखांबद्दलची उत्सुकता आणखी वाढली. परीक्षा लवकरात लवकर घेण्यात याव्या अशी मागणी उठली. त्याच मागणीची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दखल घेतली जात असून लवकरच परीक्षा होणार आहेत.

विशेष म्हणजे, सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर MPSC च्या तारखा सुद्धा पुढे ढकलण्याची मागणी वाढली होती. त्या पार्श्वभूमीवरच राज्य सरकारने या परीक्षांच्या तारखा स्थगित करण्याचा निर्णयही घेतला होता. परीक्षा पुढे ढकलल्याने कोणताही उमेदवार अपात्र ठरणार नाही अशी ग्वाही सरकारकडून देण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *