मुंबई : राज्य शिक्षण मंडळाच्या बारावी आणि दहावीच्या परीक्षांची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. १२ वीची परीक्षा २३ एप्रिल ते २९ मे २0२१ दरम्यान घेण्यात येणार असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे दहावीची परीक्षा ही २९ एप्रिल ते ३१ मे दरम्यान घेण्यात येणार असल्याचेही गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. राज्य शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा १५ एप्रिलनंतर तर दहावीची परीक्षा ३ मेनंतर घेण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याचे संकेत गायकवाड यांनी यापूर्वीच दिले होते. बारावीच्या परीक्षांचा निकाल हा जुलै महिना संपण्याआधी लावण्याचा मंडळाचा प्रयत्न असून दहावीचे निकाल ऑगस्ट महिना संपण्याआधी लावले जातील असेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.
दरवर्षी साधारण फेब्रुवारी, मार्चमध्ये दहावी आणि बारावीची परीक्षा सुरू होते. मात्र यंदा कोरोनामुळे कोलमडलेले शैक्षणिक वर्ष सुरळीत करण्याचे प्रयत्न शिक्षण विभागातर्फे सुरू आहेत. ऑनलाइन वर्गावर भिस्त ठेवून आता परीक्षांची तयारी विभागाने सुरू केली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षांच्या तारखा नुकत्याच जाहीर केल्या. त्यानंतर आता राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या परीक्षा कधी होणार याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता होती. गायकवाड यांनी परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २९ मे २0२१ दरम्यान तर दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते ३१ मे दरम्यान घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
सध्या मुंबई, ठाणे वगळून राज्यातील बहुतेक ठिकाणी नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. त्यानुसार आता पाचवी ते आठवीपयर्ंत शाळा सुरू करण्यासंदर्भात आणखी काही दिवस परिस्थितीचा आढावा घेऊन याबाबतचा निर्णय घेण्यात येईल. राज्यातील कोरोना प्रादुर्भावाची स्थिती लक्षात घेऊन आणि सार्वजनिक आरोग्य विभागाशी चर्चा करून शाळा सुरू करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
सीबीएसईच्या परीक्षा चार मेपासून
केंद्रीय शिक्षण मंडळाने (सीबीएसई) ३१ डिसेंबर रोजी दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या असून लेखी परीक्षा ४ मेपासून तर प्रात्यक्षिक परीक्षा १ मार्चपासून होणार असल्याचे म्हटले आहे. सीबीएसईची दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा ४ मे २0२१ पासून सुरू होणार असून १0 जूनपर्यंत चालणार आहेत. त्यापूर्वी बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहेत. १ मार्चपासून प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होतील. परीक्षांनंतर निकालही लगेच जाहीर करण्यात येणार असून १५ जुलैपयर्ंत निकाल जाहीर होईल. परीक्षांबाबतचा निर्णय विद्यार्थी, शिक्षक, पालक अशा सर्व घटकांनी दिलेल्या सूचना लक्षात घेऊन जाहीर करण्यात आल्याचे, रमेश पोखरियाल यांनी सांगितले.
Contents hide