• Sat. Sep 23rd, 2023

2020 माझ्यासाठी फेसबुक व सोशल मीडियासाठी अत्यंत महत्त्वाचे वर्ष…!

ByBlog

Jan 6, 2021

2020 च्या पूर्वी माझ्याकडे अँड्रॉइड मोबाईल नव्हता. साधा 500 रुपयाचा मोबाईल वापरत होतो. 2019 च्या मार्च महिन्यापासून करार तत्वावर मानधनावर महिला व बाल विकास विभाग जिल्हा कार्यालये ठाणे येथे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी या पदावर काम करत होतो.30 जून 2019 पर्यंत ठाणे येथील कार्यालयामध्ये काम केले. त्या विभागाचे वरीष्ठ अधिकारी यांची बदली झाली त्या ठिकाणी दुसरे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आले. त्यानंतर मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक महिना काम केले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या मर्जीतील जिल्हा बाल संरक्षण अधिकारी तेथे आणले. माझी बदली रायगड येथे केली. तिथे 1 जुलै 2019 ते 31 डिसेंबर 2019 पर्यंत करार संपेपर्यंत काम केले. तिथला कार्यभार त्याच अधिकाऱ्याकडे होता. त्यांनी माझी तिथे पुढील अकरा महिन्यासाठी नियुक्ती केली नाही.1 जानेवारी 2020 पासुन माझ्याकडे हातात काम नव्हते. कुटुंब कसे चालवायचे मुलांचे शिक्षण कसे पुर्ण करायचे तसेच सामाजिक काम, विमुक्त व भटक्या जमाती साठी योजलेले काम कसे करायचे तसेच आई व वडील यांचे आजारपण याचा खर्च कसा करायचा असे असंख्य प्रश्न समोर होते. लहान भाऊ अमोल ही त्याचे लग्न झाल्याने मोठ्या भावा बरोबर राहण्यास विरार ला गेला. मोठा भाऊ रस्त्यावर गाई घेऊन बसतो. त्याच्याकडे राहायला गेला. त्यामुळे मी एकाकी पडलो. अशा अडचणीच्या प्रसंगी, नोकरी गेल्याने विचारात होतो. त्यावेळेस ठाणे येथे काम करत असताना श्री. विजय जाधव, संस्थापक समतोल फाऊंडेशन, ठाणे यांचेशी ओळखं झाली होती. त्यामुळे त्यांचेकडे तुटपुंज्या पगारात काम विचारले त्यांनी काम दिले.1 जानेवारी 2020 पासून काम करायला लागलो. संस्थेतील विश्वस्त माननीय हरिहरन सर यांचेकडून मुलांची फी भरण्यासाठी मदत मिळाली. मुलांच्या फी संदर्भात तात्पुरता दिलासा मिळाला. विजय जाधव साहेब व संस्थेचा मी ऋणी आहे.आता काम वाढले होते त्यामुळे संस्थेतून मोबाईल घेण्यासाठी मदत फेब्रुवारी महिन्यात मिळाली. तेथे 1 जानेवारी 2020 ते 19 मार्च 2020 पर्यंत काम कराता आले. पुढे lockdown पडला त्यामुळे काम बंद झाले. काम आज ना उद्या सुरु होईल या आशेवर पुढील दोन महिने अर्धपोटी काढावे लागले. पुढे संस्थेला विचारले तर त्यांनी पगार देण्यास नकार दिला त्यामुळे सर्व कुटुंब घेऊन गावी यावे लागले.
या मोबाईल मुळे व lockdown मुळे सोशल मीडिया वर लिहण्यासाठी वाव मिळाला. प्रथमच चांगला मोबाईल हाती आल्याने विविध विषयावर लिहायला लागलो. कधी स्वतःचे भटकंतीचे जीवन व संघर्ष मांडायला लागलो. Facebook वाचक यांचा प्रतिसाद मिळू लागला. भटकंती चे भिक्षेकरी जीवन जगत phd पर्यंतचे शिक्षण टाटा सामाजिक विज्ञान संस्था येथे पुर्ण केले. त्यानंतर ही कामासाठी संघर्ष सुरु आहे असे व्यक्त होऊ लागलो. काही वाचक मित्र व मित्र यांचेसाठी हा माझा जीवन प्रवास थक्क करणारा होता. बऱ्याच हितचिंतक मित्रांनी, फेसबुक वाचकांनी जसे जसे त्याचेशी विचार व लेखणीतून जोडला जाऊ लागलो. तसे सोशल मीडिया वाचकांच्या बऱ्याच प्रतिक्रिया मिळाल्या यात हे भटकंतीचे जीवन व शिक्षण प्रवास, समाजा विषयी लिहून काढा अशा सूचना प्राप्त झाल्या. त्यानुसार अधिक लेखन व वाचन याकडे वळलो. मी या अगोदरच वहीत लिहून ठेवलेले माझे स्वआत्मकथन पुनः पुनः वाचनास व लिहण्यासाठी सुरु केले. दर दिवसाला 13 ते 14 तास बसून त्यावर गेले पाच महिने काम केले. पुढे स्वतःच आत्मकथन ड्राफ्ट गूगल इनपुट वर टायपिंग केले. आता आत्मकथन पुस्तक प्रकाशनासाठी , पुढील प्रक्रियेसाठी कुठे द्यायचे असा प्रश्न पडला. याचे उत्तर ही सोशल मीडिया मार्फत मिळाले. यामुळे पुणे व मुंबई येथील प्रकाशक यांचेकडे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी देणे शक्य नव्हते. त्यामुळे जवळचा प्रकाशक शोधला व त्याचेकडे पुस्तकाचे काम दिले. सध्या पुस्तक रुपात माझे जीवनावरील ‘झोळी‌‌’ हे आत्मकथन येत आहे. या दरम्यानच्या काळात lockdown वाढत गेला. माझे भाऊ व आई वडील, आजी, चुलते सर्व कुटुंब गावी आले. कुटुंबात 25 सदस्य संख्या झाली. त्यामुळे एका ठिकाणी पारंपारिक भिक्षा न मागता कुटूंब जगवणे अत्यंत कठीण आई वडील यांचेसाठी झाले. जवळपास असलेले सर्व काही पैसे संपले. भिक्षा मागण्यासाठी गावातील लोक या साथीच्या आजाराच्या भीतीने येऊ देत नव्हती. या वेळेस धडपड करून रेशन धान्य मिळवले. पुढे समाजातून उसनवारी करून जगावे लागेल. पोटाला चिमटा व पिळा घालूनच जगावे लागले. नाहीतर चार घर मागून, कधी बारा घराचा तुकडा मागून जगणारा आमचा समाज व कुटूंब कसातरी या काळात तग धरून राहीला. ही फक्त अमाचीच अवस्था नव्हती तर सध्या ही ती वंचित मजूर, भटकंती करणाऱ्या विमुक्त व भटक्या जमाती, भिक्षेकरी भटक्या जमाती मधील समाजाची आहे. दरम्यानच्य काळात इतर समाजातून दानशूर मान्यवर यांचेकडून अन्न धान्य मदत समाजाला मिळवून देता आली.
या आत्मकथनासाठी आदरणीय श्री. लक्ष्मीकांत देशमुख, माजी संमेलनाध्यक्ष यांची प्रस्तावना मिळाली त्याबद्दल त्यांचा मी सदैव ऋणी राहील. तसेच भटक्या जमातींचे राष्ट्रीय आयोग अध्यक्ष माननीय श्री. दादा इदाते साहेब, श्री. बाळकृष्ण रेणके साहेब, श्री. लक्ष्मण गायकवाड साहेब प्रसिद्ध जेष्ठ लेखक, माझे कवी मित्र श्री.सुदाम राठोड यांचे दोन शब्द फॉरवर्ड मिळाली. त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. तसेच या आत्मकथन वाचन करून प्रतिक्रिया देण्यासाठी अत्यंत मोलाचा वेळ दिला यात आदरणीय प्रा.श्री. प्रदीप मोहिते सर, प्रा. राहुल पाटिल सर, प्रा. रेणुकादास उबाळे सर, प्रा. श्री.नागनाथ चुणचुने सर, सौ. दिपाली पाटिल चौगुले मॅडम व अन्य मान्यवर ,मुद्रित शोधन सौ. शिंदे मॅडम यांचा मी ऋणी आहे. तसेच पुस्तक प्रकाशित होण्या अगोदरही 300 प्रति नोंदणी करणारे मान्यवर अधिकारी, सर्व क्षेत्रातील मान्यवर, समाज बांधव यांचा ऋणी आहे.
डवरी गोसावी समाजातली काही मान्यवर अधिकारी व समाज बांधव, उद्योजक घेऊन भिक्षेकरी समाजातली विदयार्थी शाळा बाह्य राहू नये. त्यांच्या शिक्षणामध्ये खंड पडू नये म्हणुन समाजाला मदतीचे आव्हान करून साधारणपणे 315 विद्यार्थ्यांना फुल ना फुलाची पाकळी या तत्वाने शैक्षणिक मदत मिळण्यासाठी संयोजक म्हणुन श्री
दिनेश शिंदे, श्री. भरत जगताप, श्री.अशोक जगताप यांच्या सहकार्याने योगदान दिले. यात शैक्षणिक मदतीचा वाटा उचलला तो आदरणीय वरिष्ठ अधिकारी श्री. महादेव शिंदे साहेब व श्री. मच्छिंद्र चव्हाण साहेब आणि श्री. आनंदराव जगताप साहेब, श्री. शिवनाथ शिंदे साहेब, श्री. नारायण शिंदे साहेब, प्रा. श्री.गोरख भाऊ इंगोले सर, प्रा.श्री. नारायण भोसले सर, डॉ.कृष्णा इंगोले साहेब, श्री. लक्ष्मण शेगर साहेब, श्री.भारत चौगुले साहेब, श्री. संतोष चव्हाण साहेब, श्री. मनिष चव्हाण साहेब , श्री. महादेव भोसले साहेब, डॉ.मनीषा शांताराम शिंदे मॅडम, श्री. मोहन चौगुले सर , श्री. अर्जुन एकनाथ चव्हाण इ. तसेच समाजातील दानशूर पोलिस अधिकारी, अन्य समाजातील मान्यवर अधिकारी व समाज बांधव यांची मोलाची मदत झाली यातून समाजात एक मोठा आदर्श निर्माण झाला आहे.
त्यानंतर ऑनलाईन तासिका सुरु झाल्याने या विमुक्त व भटक्या जमाती विद्यार्थी यांचेकडे मोबाईल नाही. त्यामुळे फेसबुकच्या माध्यमातूनच मदतीसाठी आव्हान केले होते. परंतु अल्प प्रतिसाद मिळाला. श्री. महादेव शिंदे साहेब, श्री. लक्ष्मण शेगर साहेब व प्रा. संबोधी देशपांडे मॅडम यांचेकडून मिळालेल्या मदतीतून फक्त दोन मुलांना मोबाईल ची मदत मिळवून देता आली. अजूनही बहुसंख्या मुले ऑनलाईन शिक्षणापासून वंचित आहेत.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

हा गेलेला काळ आमच्या साठी संघर्षमय होता आणि पुढेही असणार आहे.स्वाभिमानाने हे समाज जमाती माणूस म्हणुन जीवन व सन्मानाचे जीवन जगण्यासाठी कित्येक पिढ्या झगडत आहेत. किमान हे 2021 हे वर्ष त्यांच्यासाठी मोठ्या जीवन बदलाचे असेल ही अपेक्षा करतो. कारण दोन राष्ट्रीय पातळीवरील आयोग यांचे अहवाल पुर्णतः स्वीकारुन स्वतंत्र मंत्रालय विमुक्त व भटक्या जमाती साठी संविधानिक तरतुदी सहित देशपातळीवर सुरु होवो. तसेच राजकिय प्रतिनिधित्व मिळो.
हे गेलेले वर्ष विमुक्त व भटक्या जमातींचे प्रश्न फेसबुक व सोशल मीडिया यांच्या माध्यमातून मांडण्यासाठी महत्त्वाचे होते. यातूनच झोळी आत्मकथन साकार होत आहे. यासाठी ज्या हातांनी मदत केली त्यांचा मी अत्यंत ऋणी आहे. विमुक्त व भटक्या जमाती साठी आपण सर्व क्षेत्रातील मान्यवर, सुज्ञ , तज्ञ, अधिकारी, उद्योजक, समाज बांधव यांनी माझ्या कामावर विश्वास ठेऊन मदत केली व वंचित घटकासाठी काम करण्यासाठी संधी दिली याबद्दल मी कृतज्ञ आहे. अशीच पुढील काळात आपली मदत मिळावी व साथ, पाठींबा, आधार मिळवा ही नम्र विनंती. 2020 यावर्षी सर्व क्षेत्रातील मान्यवर यांचेशी संपर्क करता आला व मार्गदर्शन मिळाले आहे. ते असेच पुढील काळात मिळत राहो ही अपेक्षा करतो.

आपणास ,सर्वांना हे नवीन वर्ष सुखाचे व आरोग्यदायी, भरभराटीचे जावो ही शुभेच्छा..!

    डॉ. कालिदास शिंदे
    पाल निवासी
    9823985351