मुंबई : सुबोधकुमार जयस्वाल हे केंद्रीय सेवेत परतल्यामुळे रिक्त झालेल्या राज्याच्या पोलिस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार हेमंत नगराळे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. नियुक्तीनंतर लगेचच त्यांनी कार्यभार हाती घेतला आहे. पुढील आदेशापर्यंत या पदाची जबाबदारी त्यांच्याकडे राहणार आहे.
राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पोलिस दलामध्ये अनेक बदल करण्यात आले होते. गृहमंत्रालयाने काही निर्णयही घेतले होते. पोलिस दलातील सततच्या हस्तक्षेपाला सुबोधकुमार जयस्वाल यांचा विरोध होता. त्यातून ते नाराज असल्याची चर्चा होती. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी देखील यावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती. कालांतराने जयस्वाल यांनी केंद्रीय सेवेत परतण्याची परवानगी राज्य सरकारकडे मागितली होती. राज्य सरकारने ती दिल्यानंतर केंद्र सरकारने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या महासंचालकपदी त्यांची नियुक्ती केली. तसेच, त्यांना कार्यमुक्त करण्याची विनंती केली होती. त्यानुसार त्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. जयस्वाल यांच्या रिक्त जागेवर नियुक्तीसाठी बिपीन बिहारी, संजय पांडे, रश्मी शुक्ला या वरिष्ठ अधिकार्यांमध्ये स्पर्धा होती.
मात्र, तूर्त हेमंत नगराळे यांनी त्यात बाजी मारली आहे. १९८७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले नगराळे यांच्याकडं सध्या कायदे व तंत्रज्ञान विभागाची जबाबदारी आहे. त्यासोबतच त्यांना महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.
हेमंत नगराळे यांच्यावर पोलिस महासंचालकपदाची जबाबदारी
Contents hide