मुंबई : लॉकडाऊननंतर तब्बल १0 महिन्यानंतर लोकलसेवा मुंबईकरांसाठी खुली करण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यामुळे मुंबईकरांना हा मोठा दिलासा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
मात्र सामान्यांसाठी निर्धारित वेळेत हा प्रवास करता येणार आहे. पहाटे पहिल्या लोकल पासून सकाळी सात वाजेपर्यंत सकाळच्या वेळेत हा प्रवास सर्वसामान्य प्रवाशांना करता येणार आहे. तसेच दुपारी १२ ते ४ या वेळेत प्रवास करता येईल. तर रात्री ९ नंतर शेवटच्या लोकलपर्यंत प्रवासाची मुभा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे पूर्ण नसला तरी काही प्रमाणात या निर्णयाचा मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. टप्याटप्याने लोकल सेवा सुरू केली जाणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री यांनी आधीच दिले होते. अत्यावश्यक सेवेचे कर्मचारी यांच्यासाठी लोकल सेवा सुरू होती. त्यानंतर महिलांसाठी निर्धारित वेळेत ही सेवा देण्यात आली. आणि आता सर्वसामान्य लोकांसाठी ही सुविधा दिल्याने पूर्ण नसला तरी काही प्रमाणात दिलासा नक्कीच मिळाला आहे.
मुख्यमंत्र्यांनी निर्धारित वेळेत सर्वसामान्य जनतेला लोकलसेवा करण्याचे निर्देश दिले असले तरी, रेल्वे बोर्डाकडून या संबंधी माहिती समोर आलेली नाही. याआधीही महिलांसाठी निर्धारित वेळेत लोकल सेवा सुरू करण्याचे निर्देश दिले होते. मात्र त्यानंतर रेल्वे बोर्डाकडून लोकलसेवा देण्यात असर्मथता दाखवली होती. त्यामुळे आता रेल्वे बोर्ड नेमके काय निर्णय घेणार याकडे देखील सर्वांचे लक्ष असणार आहे. निर्णय घेण्याआधी राज्यसरकार आणि रेल्वेबोर्डाचे अधिकारी यांच्यात अनेक वेळा बैठका झाल्याची माहितीही देण्यात आली होती.
Related Stories
October 2, 2023
September 28, 2023