• Thu. Sep 28th, 2023

सोनू सूदची याचिका फेटाळली

ByGaurav Prakashan

Jan 22, 2021

मुंबई : बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी सोनू सूदला न्यायालयाने दणका दिला आहे. मुंबई महापालिकेने बजावलेल्या पाडकामाच्या नोटीसला सोनूने अपिलद्वारे आव्हान दिले होते. या प्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली असून महापालिकेने केलेली कारवाई योग्य असल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने अपिल आणि याचिका फेटाळली आहे.
अभिनेता सोनू सूदने जूहूमधील आपल्या मालकीच्या शक्तिसागर इमारतीत बेकायदा बदल व बांधकामे करुन हॉटेल – लॉजिंग सुरू केल्याने मुंबई महापालिकेने सोनूला नोटिस बजावली होती. सोनू सूदने पालिकेच्या नोटिसीला आव्हान देत हायकोर्टात धाव घेतली होत. परंतु, सुनावणीत हायकोर्टाने सोनू सूदची याचिका फेटाळली आहे. त्यामुळे सोनूच्या इमारतीतील बेकायदा बांधकामावर कारवाई करण्याचा मुंबई महापालिकेचा मार्ग मोकळा झाला आहे.
सोनूच्या अर्जावरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले आहे. कायदा हा फक्त प्रामाणिक, मेहनती व कर्तव्यदक्ष व्यक्तींच्या मदतीला येतो. या प्रकरणात तसे दिसत नाही. त्यामुळे अपिलकत्यार्ला कोणताही दिलासा देऊ शकत नाही. आता चेंडू मुंबई महापालिकेच्या कोर्टात आहे, असे न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी निरीक्षण नोंदवले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी सोनू सूदनं मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात पालिकेने नोटीस बजावताना आवश्यक मुदत आणि सर्व तपशील दिला जातो, मात्र माझ्याच बाबतीत पालिकेने भेदभाव केला असून काही तपशीलच दिला नाही, असा दावा केला होता. तसेच, शक्तीसागर इमारत ही १९९२पासून उभी असून ती बेकायदा नाही. मी ही इमारत २0१८-१९मध्ये घेतली होती. तशी कागदपत्रेही आहेत. ही इमारत आहे तशीच आहे आणि त्यातली एक खिडकी सुद्धा १९९२पासून तोडण्यात आलेली नाही, असंही सोनू सूदने न्यायालयात म्हणणे मांडले होते.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!