यवतमाळ : भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात लागलेल्या आगीमुळे दहा नवजात बालकांचा दुर्दैर्वी मृत्यू झाला. या पार्श्वभुमीवर यवतमाळ जिल्ह्यात भविष्यात कोणतीही अघटीत घटना घडू नये, म्हणून जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी याबाबत जिल्ह्यातील सार्वजनिक वापराच्या व वर्दळ असणा-या ठिकाणी आवश्यक सुरक्षात्मक अग्निशमन यंत्रणा तातडीने बसवून वेळोवेळी त्याचे फायर ऑडीट करण्याच्या सुचना दिल्या आहे. नगर विकास विभागाच्या २२ व २५ जून २0१२ च्या शासन परिपत्रकानुसार तसेच महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमीचे संचालक यांच्या ३0 सप्टेंबर व १६ ऑक्टोबर २0१५ च्या पत्रानुसार जिल्ह्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्था व विशेष नियोजन प्राधिकरणे यांच्या कार्यक्षेत्रातील सार्वजनिक वापराच्या व लोकांची वर्दळ असणार्या शासकीय / निमशासकीय इमारतींचे जसे की, सिनेमा हॉल्स, नाट्यगृहे, रुग्णालये, शैक्षणिक, वाणिज्यिक / व्यापारी संकूले, मॉल्स, सुपर बाजार, तारांकित हॉटेल्स, मोठी व्यावसायिक कार्यालये, निमशाकीय हॉस्पीटल, औद्योगिक क्षेत्र इत्यादी ठिकाणी सुरक्षात्मक अग्निशमन यंत्रणा बसवून त्याबाबतचे वेळोवेळी परिक्षण (फायर ऑडीट) करणे बंधनकारक असल्याच्या सुचना जिल्हाधिकार्यांनी दिल्या.याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता, वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, नगर पालिका जिल्हा प्रशासन अधिकारी, जिल्ह्यातील सर्व नगर पालिका / नगर पंचायतयींचे मुख्याधिकारी, जिल्हा अग्निशमन अधिकारी यांनी शासनाच्या परिपत्रकातील मार्गदर्शक सुचनांप्रमाणे प्राधान्याने योग्य कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असेही जिल्हाधिकार्यांनी आदेशात म्हटले आहे.