• Thu. Sep 28th, 2023

सीमाभाग महाराष्ट्राचाच : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला पुरावा

ByGaurav Prakashan

Jan 29, 2021

मुंबई :साठ वर्षांपूर्वी कारवारमधल्या एका शाळेत इंग्रजी, मराठी, कोंकणीतून अर्थ शिकविणारी शिक्षिका, एनसीसी बटालियनचा जुना मराठी नामफलक, कानडा जिल्हय़ाचे ‘विचारी’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र, १९१२ चा कारवार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा मराठी वार्षिक अहवाल, बेळगावमधील १८९0 मध्ये बांधलेल्या पुलाचा मराठीतला शीलाफलक अशा प्रकारे कर्नाटकातल्या सीमा भागामधले शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वीपासूनच्या मराठी भाषेचे आणि संस्कृतीचे पुरावे सलगपणे समोरच्या कृष्णधवल पडद्यावर उलगडत जातात आणि आपण स्तिमित होतो. राज्याच्या माहिती व जनसंपर्क संचालनालयाच्या माध्यामातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा पुरावा सादर केला आहे.
सध्याच्या सीमाभागातील वातावरणाच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र शासनाने ५0 वर्षांपूर्वी तयार केलेला ‘अ केस फॉर जस्टीस’ हा ३५ मिनिटांचा अप्रतिम आणि संग्राहय़ लघुपट सर्वांना बघण्यासाठी उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. घडली माला अर्शू फुलांची, या सामाजिक नाटकाचा नोव्हेंबर १९७0 मधला मराठीतला फलक, १९३९ मधील स्थापन झालेल्या कारवारच्या मराठी महिला मंडळाची बैठक, तत्कालीन म्हैसूर राज्यातील नामांकित नेते आनंद नाडकर्णी यांचे १९१२ मधील मराठीतले दत्तक पत्र, कानडा जिल्हय़ातील १९६0 मधील पहिले मराठी वृत्तपत्र, १८९0 मधला बेळगाव म्युनिसिपालटीने बांधलेल्या पुलावरील मराठीतील शिलाफलक, कोळी पुरुष आणि महिलांची त्या काळाची महाराष्ट्रीय वेशभूषा असे नानाविध पुराव्यांचे प्रभावी चित्रीकरण या लघुपटात पहायला मिळते.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!